

पुणे, ता. २ : जिल्हा परिषदेच्या सभापतिपदासाठी भोर तालुक्यातील विक्रम खुटवड यांचे नाव निश्चित होते. पक्षाकडून नावाचा विचार झाला असतानाही त्यांनी, ‘आपल्याला पद नको’ अशी भूमिका व्यक्त केली. त्यानंतर राजगड तालुक्यातील अमोल नलावडे यांच्या नाव पुढे आले. ‘मला कुठले पद हवे होते, म्हणून मी हे पद नाकारले असे नाही. भविष्यात एखादी चांगली संधी मिळू शकते,’ असे स्पष्टीकरण त्यांनी निवडणूक प्रक्रियेनंतर पत्रकारांशी बोलताना दिले.
सभापती निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक झाली. त्यामध्ये तीन जिल्हाध्यक्ष, तसेच पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी पक्षाकडून बंद पाकिटामध्ये आलेल्या सभापतिपदासाठी विक्रम खुटवड आणि दीपाली हुलावळे, त्याचबरोबर समाज कल्याण समितीसाठी जितेंद्र बडेकर आणि महिला बालकल्याण समितीसाठी अंकिता पाटील यांची नावे असल्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी सांगितले. मात्र, खुटवड यांनी सभापतिपद घेण्यास नकार दिला. त्यानंतर ऐनवेळी पक्षाकडून अमोल नलावडे यांचे नाव निश्चित करून त्यांची घोषणा करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष किंवा उपाध्यक्षपदासाठी खुटवड यांचेही नाव चर्चेत होते. त्यानंतर त्यांचा विचार सभापतिपदासाठी करण्यात आला, मात्र त्यांनी जाहीर झालेले पद नाकारले.