

पुणे, ता. ४ : खरीप हंगामापूर्वी कृषी निविष्ठांमधील ‘लिंकिंग’चा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने तपासणी मोहीम तीव्र करण्यासाठी निरीक्षकांची संख्या वाढवली आहे. मात्र, या कारवाईचा प्रत्यक्ष दिलासा शेतकऱ्यांना कितपत मिळतो, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. यासह दरवर्षीप्रमाणे कारवाईचा धाक दाखवण्यासोबतच इतर काही उपाययोजना करण्याचीही चाचपणी कृषी विभागाकडून सध्या सुरू आहे.
दरवर्षी खरिपापूर्वी ‘लिंकिंग’ विरोधात कारवाईचा इशारा दिला जातो. मात्र प्रत्यक्षात काही विक्रेत्यांकडून नियमांना बगल देत शेतकऱ्यांची पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी कायम आहेत. यंदा या प्रकारांना आळा घालण्यासाठी अधिक पथके तैनात करणार आहेत. परवानाधारक विक्रेत्यांवर अचानक तपासण्या केल्या जाणार आहेत. कृषी निविष्ठा विक्री करताना कोणत्याही वस्तूची सक्ती करणे बेकायदेशीर असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. अशा प्रकारांची तक्रार आल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. तरीही, कारवाईचा धाक प्रत्यक्ष कितपत परिणामकारक ठरतो, हा प्रश्न कायम आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे खरिपासाठी खतांचा तुटवडा भासू शकतो, अशा परिस्थितीमध्ये खतांवर इतर उत्पादनाची सक्ती होऊ नये, अशी इच्छा शेतकरी व्यक्त करत आहेत.
‘लिंकिंग’ म्हणजे काय?
खत किंवा इतर कृषी निविष्ठा खरेदी करताना विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांना एखादी दुसरी वस्तू सक्तीने घ्यायला लावणे, याला ‘लिंकिंग’ असे म्हणतात. युरिया किंवा डीएपीसारखे खत घ्यायचे असल्यास त्यासोबत कीटकनाशक, सूक्ष्मअन्नद्रव्ये किंवा इतर उत्पादने घेण्याची अट घातली जातेत.
कृषी आयुक्तालयाकडून उपाययोजना...
- खत टंचाई आणि ‘लिंकिंग’च्या प्रकारांना आळा घालणार
- राज्य सरकारचा ‘उत्तर प्रदेश पॅटर्न’ राबवण्याचा निर्णय
- खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक लूट रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करणार
- खत विक्रीत सक्ती किंवा नियमबाह्य व्यवहार आढळल्यास विक्रेत्यांवर कडक होणार कारवाई
- नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांचे परवाने थेट रद्द करण्याचे निर्देश
खत घ्यायला गेलो की त्यासोबत इतर औषधे किंवा उत्पादने घ्यायला भाग पाडले जाते. गरज नसतानाही पैसे खर्च करावे लागतात. यामुळे खर्च वाढतो आणि शेतीचा ताळमेळ बिघडतो. प्रशासनाने यावर खरोखर कडक कारवाई केली, तरच आम्हाला दिलासा मिळेल.
- जिजाराम इंगळे, शिरूर
शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा खरेदी करताना होणारा लिंकिंगचा त्रास कमी होण्यासाठी उपाययोजना आखण्यात येत आहेत. अतिरिक्त मनुष्यबळही उपलब्ध झाले आहे. परिणामी यावेळी तपासणी आणि कारवाईचा वेग वाढेल. लिंकिगला आळा बसेल अशी अपेक्षा आहे.
- अजित पिसाळ, जिल्हा कृषी अधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.