मुठा खोऱ्यास टेमघर धरण ठरेना वरदान

मुठा खोऱ्यास टेमघर धरण ठरेना वरदान
Published on

पिरंगुट, ता. १५ : पुणे शहराला टेमघर धरण वरदान ठरले आहे. मात्र मुठा खोऱ्यातील अठरा गावांतील भूमिपूत्रांसाठी ‘धरण उशाशी आणि कोरड घशाशी’ अशी परिस्थिती उन्हाळ्यात निर्माण होते. धरणातील पाणी मुठा नदीत सोडल्यानंतरच या गावांना पाणी मिळते. मात्र, भर उन्हाळ्यात टंचाई निर्माण होते. त्यामुळे आताच टेमघर प्रादेशिक पाणीपुरवठा योजना राबविण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
सुमारे सोळा वर्षांपूर्वी काही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्राथमिक लोकवर्गणी काढून सुमारे पाच ते सहा लाख रुपये या योजनांसाठी जीवन प्राधिकरणाकडे जमा केलेले होते. हे सर्व पैसे या योजनेचे सर्वेक्षण करण्यातच खर्च झाले. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार या योजनेचा आराखडा व एकाहत्तर कोटी रुपयाचे अंदाजपत्रक तयार करून शासनाकडे पाठविले होता. मात्र, त्यानंतर शासनाने ही योजनाच नामंजूर केल्याने बारगळली. तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांतील ग्रामस्थांची नशिबी ‘तेल गेले, तूप गेले. हाती धुपाटणे आले’, अशी अवस्था झाली. सध्या तरी योजनेचे पैसे बुडीत ठरले आहेत. सुमारे चाळीस किलोमीटर अंतराच्या परिसरातील टंचाईग्रस्त गावांना ही योजना जलदूत ठरणार होती. मुठा खोऱ्यातील अठरा तर पूर्व मुळशीतील सात गावांनाही योजना वरदान ठरणार होती.

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतून प्रस्तावित असलेल्या या योजनेचे शीर्षक बदलून ते मुख्यमंत्री पेयजल योजना असे झाले होते. ही योजना राबविल्यास मुठा खोऱ्यातील टेमघर, कोळावडे, लवार्डे, खारावडे, आंदगाव, वातुंडे, वांजळे, माळेगाव, जातेडे, डावजे, कातवडी, कोंढूर, वेगरे, मुठा, वेडे आणि भोडे आदी गावे तर पूर्व भागातील गावे मुकाईवाडी, लवळे, भुकूम, भूगाव, बावधन, आंबेगाव व मारणेवाडी आदी गावांना या योजनेचा लाभ होईल. पुणे महानगर पालिकेच्या लगत असलेल्या भूगाव, बावधन, भुकूम आदी गावांचाही समावेश असल्याने तेथील मोठी टंचाई दूर होईल. केवळ गुरुत्ववाहिनीने या पाण्याचे वितरण होणार असल्याने मोटरपंपासाठी लागणारी वीज वाचणार आहे.

मुठा नदीतील पाणी प्रदूषित होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे टेमघर प्रादेशिक पाणी योजना राबविल्यास नागरिकांना शुद्ध, प्रदूषणरहित पाणी मिळणार असल्याने आरोग्य चांगले राहणार आहे.
- सयाजी आढाव, माजी सरपंच, कोळावडे

टेमघर पाणी योजनेचा आराखडा २०१४ मध्ये तयार केला होता. तांत्रिक मान्यता मिळाल्यानंतर मंत्रालयात शासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव पाठविला होता. मात्र तो मंजूर झाला नाही.
-श्रीकांत राऊत, उपविभागीय अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com