‘कोकणवाहिनी’ वाहतूक कोंडीच्या विळख्यात

‘कोकणवाहिनी’ वाहतूक कोंडीच्या विळख्यात

Published on

पिरंगुट, ता. १८ : मुळशी तालुक्यातून कोकणात जाण्यासाठी पुणे- कोलाड या महामार्गाचा वापर करावा लागतो. त्यामुळे या रस्त्याला मुळशीतील कोकणवाहिनी म्हणतात. परंतु हीच कोकणवाहिनी आता वाहतूक कोंडीच्या विळख्यात अडकली आहे.
चांदणी चौक ते पौड या दरम्यान भागवत फार्म, भूगाव गावठाण, माताळवाडी फाटा, लवळे फाटा, पिरंगुट, घोटावडेफाटा आणि पौड आदी ठिकाणी नित्याची आणि हमखास कोंडी होतेच. पीएमआरडीए, एमएसआरडीसी, पिंपरी चिंचवडचा वाहतूक पोलिस विभाग, ग्रामपंचायत, लोकप्रतिनिधी, तसेच संबंधित प्रशासन यांपैकी कुणीही या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहायला अद्याप तयार नाही.
या वाहतूक कोंडीत दिवसेंदिवस भर पडत चालली असून, रोजच वाहतुकीचा खोळंबा होत आहे. येथील रस्ता सुरळीत होण्यासाठी सामुहिक कार्यवाहीची गरज आहे. भूगाव आणि घोटावडे फाटा ही दोन ठिकाणे म्हणजे वाहतूक कोंडीचा कळस झालेला आहे. यापूर्वी शनिवार, रविवार, तसेच सुट्टीच्या दिवशीच या ठिकाणी कोंडी व्हायची पण सध्या रोजच होत आहे. त्यामुळे प्रवासी, वाहनचालक त्रस्त झाले असून, दाद कोणाकडे मागायची या विवंचनेत मुळशीकर आहेत.
रविवार हा पिरंगुटचा, तर मंगळवार हा पौडच्या आठवड्याचा बाजाराचा दिवस असल्याने या दिवशी या रस्त्यालगतच्या विक्रेत्यांकडे माल खरेदी करण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडालेली असते. अनेक ग्राहकांच्या दुचाकी, तसेच अन्य वाहने रस्त्यातच उभी केलेली असतात. या परिसरात व्यापाऱ्यांनी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने रस्त्याच्या दुतर्फा उभारलेली असतात. त्यामुळे वाहतूक ठप्प होऊन सुमारे दीड ते दोन किलोमीटर लांबीच्या वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात.
कोकण, ताम्हिणी, मुळशी धरण, लवासा, तसेच अन्य गड किल्ले व पर्यटन स्थळे पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. कोकणात जाणाऱ्या पर्यटकांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. पिरंगुट, उरवडे, कासारअंबोली, भरे, आंबडवेट आदी परिसरातील वाढलेले औद्योगिकीकरण व नागरिकरण यामुळे वाहनांच्या संख्येतही गेल्यावर्षीच्या तुलनेने पाचपट वाढ झाल्याने या रस्त्यावर वाहतुकीचा मोठा ताण आलेला आहे. त्यामुळे नित्याच्याच कोंडीने प्रवासी हैराण झालेले आहेत.
पिरंगुट परिसरातील अनेक कंपन्यांच्या कामकाजाची वेळ सारखीच आहे. कंपनीच्या व्यवस्थापनांनी एकत्र येऊन त्यांच्या भरण्याच्या व सुटण्याच्या वेळापत्रकात बदल करणे आवश्यक झाले आहे.


वाहतूक कोंडीवेळीच पोलिस गायब
यापूर्वी भूगाव ते घोटावडे फाटा हा परिसर पौड पोलिसांच्या अखत्यारित होता. त्यामुळे कोंडीवेळी पौड पोलिस तातडीने घटनास्थळी उपस्थित राहून समस्या सोडवित होते. मात्र, सध्या पिंपरी चिंचवडच्या अंतर्गत असलेल्या बावधन पोलिस ठाण्यात हा परिसर गेल्याने वाहतूक कोंडीची समस्या पूर्ण संपेल, अशी आशा होती. ऐन कोंडीवेळीच पोलिस गायब होत असल्याने स्थानिकांना नियमन करण्याची वेळ येते. त्यामुळे ही समस्या आणखी वाढली असल्याने आपले पौड पोलिस ठाणेच चांगले होते, अशी प्रतिक्रिया वाहन चालक व नागरिकांतून येत आहेत.

या विभागासाठी सध्या पाच ते सहा पोलिस कर्मचारी कार्यरत आहेत. पिरंगुट येथील उद्योजकांच्या संघटनेसोबत चर्चा झाली असून, वाहतुकीचे नियमन करण्यासाठी त्यांच्याकडे दहा वॅार्डनची मागणी केली आहे. त्यांच्याकडील मनुष्यबळ मिळाले की येथील वाहतूक समस्या सुटणार आहे.
-विजय वाघमारे, वरिष्ठ निरीक्षक, वाहतूक विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com