‘आरटीई’चे अनुदान थकल्याने
पालकांकडे शुल्कासाठी तगादा

‘आरटीई’चे अनुदान थकल्याने पालकांकडे शुल्कासाठी तगादा

Published on

पिरंगुट, ता. ५ : घोटावडे- शेळकेवाडी (ता. मुळशी) येथील द न्यू डेल इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेला शासनाचे मिळणारे आरटीई अनुदान थकल्याने व्यवस्थापनाकडून पालकांकडे शुल्काचा तगादा लावला जात आहे. त्यामुळे पालकांनीच पुढाकार घेऊन थकलेले अनुदान मिळण्याची मागणी शासनाकडे केली आहे.
याबाबत पालकांनी सांगितले की, गेल्या सहा वर्षांमध्ये या शाळेमध्ये ‘आरटीई’अंतर्गत सुमारे सत्तरहून अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. परंतु, शासन स्तरावरती शिक्षण विभागाकडून या शाळेला अनुदानाचे पैसे न आल्यामुळे पालक आणि शाळा व्यवस्थापन अडचणीत आले आहे. याबाबत पालक शरद गोडांबे यांच्या पुढाकाराने पुणे येथील प्राथमिक शिक्षण विभागाचे राज्याचे सहसंचालक रमाकांत काठमोरे, आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग यांना पालकांच्या वतीने निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, नक्की कुठल्या निकषावरती शिक्षण विभागाने अनुदान थांबवले, त्याची माहिती आपण आपल्या स्तरावर घेऊन सर्व आरटीईच्या मुलांना व पालकांना न्याय द्यावा.
याबाबत शाळेच्या मुख्याध्यापिका एस. एस. खोजे म्हणाल्या, ‘‘या विद्यालयाला आरटीई अंतर्गत शासनाकडून मिळणारे अनुदान शैक्षणिक वर्ष २०१७- २०१८ पासून मिळालेले नाही. सुमारे ५६ लाख रुपये अनुदान न मिळाल्याने शाळा चालविणे अवघड झाले आहे. त्यामुळे शाळेने आरटीई अंतर्गत प्रवेश घेतलेल्या पालकांकडून प्रत्येकी वीस हजार रुपये आर्थिक मदतीची मागणी केली आहे. शासनाकडून अनुदान मिळाल्यावर ही रक्कम त्यांना परत केली जाणार आहे. पण, पालक ही रक्कमही भरायला तयार नसल्याने शाळा अडचणीत आली आहे. आरटीई प्रवेश गरीब लोकांसाठी आहे, पण या परिसरात पन्नास टक्के लोक चार चाकी वाहनातून येऊन प्रवेश घेऊन गेले आहेत.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com