भरे रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी
पिरंगुट, ता. ८ : ‘‘भरे (ता. मुळशी) येथील वीज वितरण कंपनीचे कार्यालय ते भरे फाटा या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी. हा रस्ता नव्याने तयार करावा.’’ अशी मागणी मुळशी तालुका माल वाहतूक व्यवसाय संस्थेने केली आहे. या बाबतचे लेखी निवेदन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना देण्यात आले आहे. यावेळी मालवाहतूक व्यवसाय संस्थेचे अध्यक्ष प्रदीप गोडांबे, दिनेश मातेरे, भानुदास रानवडे, विश्वास जाधव, भूषण कदम उपस्थित होते.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, भरे येथील महावितरण कंपनीचे कार्यालय ते भरे फाटा या दरम्यानच्या रस्त्याची परिस्थिती बिकट स्वरूपाची झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडून त्यामधून रोज जीव मुठीत धरून नागरिक प्रवास करीत आहेत. महिला, शाळेत ये-जा करणारे विद्यार्थी, नोकरदार वर्ग, पिरंगुट इंडस्ट्रीमध्ये येणारी, मुंबईकडून येणारी वाहने रोज धोकादायक पद्धतीने प्रवास करीत आहेत. त्यामुळे रोज अपघात घडत आहेत. हा रस्ता घोटावडे फाटा चौकातून हिंजवडीकडे जाणारा आहे. सातारा, कोल्हापूर, ताम्हिणी, कोकण, लवासाकडे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांचा प्रवास या रस्त्याने होत असतो. घोटावडे फाटा ते हिंजवडी तसेच तालुक्यातील इतर रस्त्यांची कामे रोडवेज सोल्यूशन कंपनीला देण्यात आली होती. भरे रस्त्याचे काम सुरू केले असता वनपरिक्षेत्र अधिकारी भरे यांनी काम थांबवले होते. कालांतराने वनपरिक्षेत्राची परवानगी घेतली आणि सार्वजनिक बांधकाम विभाग, मुळशी यांनी रोडवेज सोल्यूशन कंपनीचा प्रस्ताव शासनाकडे टर्मिनेट करण्यासाठी डिसेंबर २०२४ मध्ये पाठवला आहे. हा प्रस्ताव शासनाकडे पाठवून ७ महिने उलटूनही या रस्त्याचे काम अजूनही तसेच प्रलंबित आहे. त्यामुळे हा पाठवलेला प्रस्ताव शासनाने लवकरात लवकर टर्मिनेट करून पुढील कामांची निविदा लवकरात लवकर काढावी.