पुणे-कोलाड रस्ता की कचरा डेपो?

पुणे-कोलाड रस्ता की कचरा डेपो?

Published on

पिरंगुट, ता. २५ : येथील परिसरात कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. पुणे-कोलाड रस्त्यालगत या कचऱ्याचे साम्राज्य झाले असून हा रस्ता कचरा डेपो बनला आहे. ग्रामपंचायत, पीएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल, पोलिस, वनविभाग यांच्यापैकी कोणत्याही विभागाकडून येथील कचरा टाकण्याऱ्यांवर कायमस्वरूपी व सातत्यपूर्ण कारवाई केली जात नसल्याने हा रस्ता कायमच घाणीच्या साम्राज्यात असतो. या रस्त्यालगत कचरा टाकणाऱ्यांवर ग्रामपंचायतीने सातत्याने कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
पिरंगुट (ता.मुळशी) येथील पिरंगुट खिंड ते मुकाईवाडी मार्गे उरवडे रस्ता, पिरंगुट घाट ते भैरवनाथ नगर, घोटावडे फाटा ते उरवडे रस्ता आदी मुख्य रस्त्यांवर कचऱ्यांचे साम्राज्य झाले आहे. तालुक्यातील वाढलेले नागरिकीकरण, पिरंगुट परिसरातील औद्योगीकरण आणि झपाट्याने वाढत चाललेली लोकसंख्या यामुळे येथील कचरा निर्माण होण्याचे प्रमाणही वाढले आहे. पिरंगुट परिसरात दवाखाने, उपाहारगृहे, मांस, मासे विक्रीची दुकाने, विविध कंपन्या आदींमुळे निर्माण होणाऱ्या टाकाऊ मालाच्या कचऱ्याचे प्रमाण वाढले आहे. रात्रीच्यावेळी या मुख्य रस्त्यालगत कचरा टाकला जातो. ग्रामपंचायतीने कचरा टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी जोर धरीत आहे.

सूचना फलकालगतच ढीग
पिरंगुट ग्रामपंचायतीने घंटागाडीच्या साह्याने कचरा उचलण्याची व्यवस्था केली असूनही घंटागाडीऐवजी मोकळ्या जागांत कचरा फेकण्याचे प्रमाण वाढले आहे. येथील घाट रस्त्यातील म्हसोबा मंदिरपासून मुकाईवाडीकडे जाणारा रस्ता म्हणजे कचरा टाकणाऱ्यांना हक्काचे ठिकाण झाले आहे. सूचना फलकालगतच कचऱ्यांचे ढीग लागायला सुरुवात झाली आहे.

पिरंगुट ग्रामपंचायतीने गावठाण, परिसरातील गृहनिर्माण संस्था तसेच अन्य नागरीवस्तीमधून कचरा टाकणाऱ्यांवर दंडाची कारवाई सुरू केली आहे. तशीच कारवाई मुकाईवाडी रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर करणे अत्यावश्यक आहे. आठवड्यातून किमान एकदा तरी घंटागाडी या रस्त्यावर आणून येथील कचरा उचलला पाहिजे.
- भानुदास गोळे, अध्यक्ष, पिरंगुट विकास संस्थेचे

4960

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com