कोंडीच्या विळख्याने गुदमला श्‍वास

कोंडीच्या विळख्याने गुदमला श्‍वास

Published on

पिरंगुट, ता. २७ : पुण्याहून चांदणीचौकातून कोकणात जाणारा रस्ता वाहतूक कोंडीच्या विळख्यात अडकणे ही नित्याचीच बाब बनली झाली आहे. चांदणी चौक ते पौड या दरम्यान भूगाव, पिरंगुट, घोटावडे फाटा आणि पौड येथे वाहतूक कोंडीमुळे प्रवासी, स्थानिक नागरिकांचा श्‍वास कोंडला आहे. त्यामुळे कोंडीच्या विळख्यातून मुक्त होण्यासाठी ठोस उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याची मागणी त्रस्त नागरिकांकडून होत आहे.

भूगाव, भुकूम, कासार आंबोली, उरवडे तसेच पिरंगुट परिसरातील औद्योगीकरण व गृहनिर्माण संस्थांमुळे नागरिकरणात मोठी वाढ झाल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भूगाव येथील गावठाणातील सुमारे तीनशे मीटर अंतराचा रस्ता अतिशय अरुंद आहे. पुण्याहून मुळशीत तसेच कोकणात जाण्यासाठी भूगाव येथील गावठाणातील कोलाड रस्त्याशिवाय पर्यायी व सोयीचा कोणताही मार्ग नाही. भूगाव परिसरात रहिवासी संस्थांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शाळा, महाविद्यालये तसेच अन्य संस्थांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. त्यामुळे लोकसंख्या आणि वाहनांची झालेली वाढ यामुळे गावठाणातून जाणाऱ्या अरुंद रस्त्यावर ताण येऊन कोंडीत भर पडत आहे. पिरंगुट ते भूगाव या दरम्यान विविध शाळांतील हजारो विद्यार्थी पुण्याहून येजा करतात. त्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या सुमारे चारशे ते पाचशे इतकी आहे. एकाचवेळी ही वाहने रस्त्यावर आल्यामुळे कोंडी वाढत आहे.

अतिक्रमणे हटविणे गरजेचे
भूगाव, लवळे फाटा, पिरंगुट, घोटावडे फाटा आणि पौड आदी ठिकाणची रस्त्यावर थाटलेली दुकाने, स्टॉल्स, पथारीवाले, भाजीवाले आदींचे अतिक्रमण हटविणे, रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा ठरणारी तसेच उभी केलेल्या वाहनांवर कडक कारवाई करणे, त्यासाठी नो पार्किंग झोन निश्चित करणे गरजेचे बनले आहे. भूगाव येथील रामनदी ते आंग्रेवाडी फाटा या कोलाड रस्त्यावर बहुतांशी ठिकाणी अतिक्रमणे मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहेत. पीएमआरडीएने येथील अतिक्रमणे काही दिवसांपूर्वी कारवाई केली होती. मात्र, आता तेथे पुन्हा अतिक्रमणे झाली आहेत. ती काढणे आवश्यक बनले आहे.

पर्यायी मार्गांचा विकास
भूगाव, पिरंगुट, घोटावडे फाटा तसेच पौड आदी ठिकाणी अंतर्गत बाह्यवळणे तयार करण्यासाठी गावठाणांतील जोडरस्ते दुरुस्त करून वाहतूक विभागणी करावी.

कोंडी दूर करायची असेल तर
- भूगावच्या बाह्य वळण रस्ता तातडीने मार्गी लावणे
- पौड ते भूगाव रस्त्यावरील महत्त्वाच्या वळणांवर दोन पदरी रस्ता किमान चार पदरी रुंद करणे
- खड्डेमुक्तीची मोहीम तत्काळ राबवणे
- दुरुस्तीच्या वेळी वाहतुकीच्या सोयीसाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूने पक्का, टिकाऊ करावा


वाहतूक व्यवस्थापन
- पीक अवर्समध्ये भूगावला रॅंडमली एकेरी वाहतूक योजना तात्पुरती राबवा.
- भूगावच्या गारवा हॅाटेललगतचे वळण, पिरंगुट घाटातील म्हसोबा मंदिर, भैरवनाथ नगर, श्रीपाद हॅाटेल आणि लवळे फाटा येथील धोकादायक वळणांवर इंडिकेटर्स, रिफ्लेक्टर्स, चेतावणी फलक बसविणे
- भूगावमधील सॅांग बर्ड फाटा, मॅांट व्हर्ट फाटा, माताळवाडी फाटा, आंग्रेवाडी फाटा जाणारा रस्ता, पिंरगुटला लवळे फाटा, गावठाणातील कॅंप भाग आणि घोटावडे फाटा येथे स्मार्ट सिग्नल बसविणे
- पिरंगुट कॅंपवरून गावठाणात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर तसेच घोटावडे फाटा येथील चौकात उड्डाणपूल अथवा भूयारी मार्ग
आवश्‍यक
- वाहतुकीच्या कालावधीत डंपर, मिक्सर तसेच व अवजड वाहनांना बंदी


सार्वजनिक वाहतूक सुधारणा
- पीएमपीएमएलच्या बसेसच्या फेऱ्या वाढविणे
- वाहतूक वाढत्या त्यावेळी मिनी बस अथवा शटल सेवा सुरू करणे
- वाहतुकीला अडथळा करणारे बस थांबे योग्य ठिकाणी हलविणे


यामुळे लागेल कोंडी सुटण्यास हातभार
- पोलिस, स्थानिक व प्रशासनाचा समन्वय साधून वाहतूक पोलिस नियमित तैनात असावेत.
- शाळा तसेच कार्यालयांच्या भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेत विशेष पथक गरजेची
- पिरंगुट परिसरातील कंपन्यांच्या कामकाजांच्या वेळेत बदल
- कंपनीच्या व्यवस्थापनांनी एकत्र येऊन कामा वेळापत्रकात बदल करावा
- विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांवरील नियंत्रणासाठी स्वयंसेवकांची गरज


स्वतंत्र भाजी मंडईसाठी कायमस्वरूपी जागा
रस्त्यालगतच्या गावांतील गृहनिर्माण संस्थांच्या विकसकांना रस्ते व पार्किंगच्या अटींचे पालन करण्यासाठी सक्ती करावी लागेल. भविष्यातील दहा वर्षांचा वाहतूक आराखडा तयार करून वाहतूक कोंडी सोडविता येईल. पौड, घोटावडेफाटा, पिरंगुट, लवळे फाटा आणि भूगावला भाजी मंडईसाठी स्वतंत्र व प्रशस्त जागा नाही. सर्व भाजी विक्रेते रस्त्याच्या दुतर्फा पथारी मांडून बसलेले असतात. भाजी खरेदी करणारे व त्यांची वाहनेही रस्त्यालगतच उभी राहिल्याने वाहतुकीला अडथळा होतो. त्यामुळे या चार ठिकाणी स्वतंत्र व प्रशस्त भाजी मंडईसाठी कायमस्वरूपी जागा उपलब्ध होणे अत्यंत गरजेचे आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुळशीत हिंजवडी ते घोटावडे फाटा तसेच चांदणी चौक ते पौड हे दोन मेट्रो मार्ग सुरू करण्याचे आश्वासन दिलेले आहेच. हे आश्वासन पूर्ण झालेच तर वाहतूक कोंडीचा प्रश्न काही अंशी मार्गी लागणार आहे.


पिरंगुट घाट- मुकाईवाडी-उरवडेमार्गे घोटावडे फाटा हा रस्ता तसेच पौड-दारवली-भरे-लवळे ते लवळे फाटा हा रस्ता पर्यायी रस्ता म्हणून वापरात यावा व त्यासाठी जादाची वाहतूक यंत्रणा राबवावी. लवळे फाट्यावरून पिरंगुट गावठाणात जाण्यासाठी पर्यायी अंतर्गत रस्ता सुरू करावा. लवळे फाटा चौक, पिरंगुट गावठाण चौक, घोटावडे फाटा चौक, पौड बस स्थानक व भूगाव गावठाणात कायमस्वरूपी वाहतूक पोलिस अथवा होम गार्ड आदी यंत्रणा सज्ज असावी. कोलाड रस्त्याला महामार्ग म्हणतात तर मग या रस्त्याला सेवा रस्ता असलाच पाहिजे. अनेक ठिकाणी रस्ते व साईडपट्टी तयार केल्यासही कोंडी सुटण्यास मदत होणार आहे.
- शरद प्रकाश थोरवे, सहाय्यक व्यवस्थापक, वारी फॉरएवर एनर्जीज, पिरंगुट

04968, 4970

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com