पिरंगुट घाटातील अपघातात दोन मोटारींतील तिघे जखमी
पिरंगुट, ता. २० : पुणे- कोला़ड महामार्गावर पिरंगुट (ता. मुळशी) येथील घाटात शनिवारी (ता. २०) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास दोन मोटारींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात तिघेजण जखमी झाले.
याबाबत बावधन वाहतूक पोलिसांनी माहिती दिली की, शनिवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास पुण्याहून पौडकडे चाललेली मोटार (क्र. एमएच १४ एमएल ८२८९) व पिरंगुटकडून पुण्याच्या दिशेने चाललेली मोटार (क्र. एमएच १२ ईएक्स ३९८५) यांची पिरंगुट येथील घाट रस्त्यातील थोरली मोरी व धाकटी मोरी या दरम्यान धडक झाली. या भीषण अपघातात दोन्हीही मोटारींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यात तिघेजण जखमी झाले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनास्थळी बावधन वाहतूक पोलिस तातडीने दाखल झाल्याने वाहतूक सुरळीत करण्यात आली. वाहतूक पोलिस नाईक अजित कुटे, सुरेश जायभाय व अमूल पारधी यांनी वाहतूक सुरळीत करून अपघातग्रस्तांना मदत केली.
दरम्यान या रस्त्याच्या पश्चिमेकडील भागातील परिसरात मोठ्या प्रमाणावर शहरीकरण झालेले आहे. त्यासाठी पुणे- कोलाड या मुख्य महामार्गावर उपरस्ते काढलेले आहेत. ते तीव्र वळणाचे व उताराचे आहेत. या उपरस्त्यांवरून मुख्य रस्त्यावर येताना वाहनचालकांना कसरत करावी लागते. त्यातूनच हा अपघात झालेला आहे. याबाबत वाहतूक पोलिस नाईक अजित कुटे यांनी सांगितले की, पिरंगुट घाट रस्त्याला तीव्र उतार आहे. त्यामुळे उताराच्या दिशेने पिरंगुटकडे जाताना वाहनचालकांनी वेगाची मर्यादा पाळली पाहिजे. रस्ता रुंदीकरणामुळे वाहनांचा वेगही वाढला आहे. त्यामुळे अपघातांनाही निमंत्रण ठरत आहे वाहनचालकांनी या रस्त्यावर संयम राखणे अत्यावश्यक आहे.

