मुळशीतील पर्यटन आनंददायी अन् सुरक्षित
मुळशीतील पर्यटन
आनंददायी अन् सुरक्षित
जैवविविधतेने भरगच्च संपन्न असलेली निसर्गसंपदा, धार्मिक स्थळांचा विकास, शुद्ध हवामान, देवरायांची देणगी, धरणांची उपलब्धता, धबधब्यांची रेलचेल, गड किल्ल्यांचा ठेवा, कृषी पर्यटन स्थळांची निर्मिती, ऑनलाइन व्यावसायिक कॅंपेनिंग, वनविभागाकडून उपाययोजना आदींमुळे मुळशीतील पर्यटन सुखावह, आल्हाददायी, आनंददायी आणि सुरक्षित झाले आहे. याशिवाय चांगल्या रस्त्यांचे जाळे व मोबाइल नेटवर्क सुविधांमुळे मुळशीतील पर्यटन स्थळांकडे ओढा वाढला आहे.
- धोंडिबा कुंभार, पिरंगुट
ब्रिटिश पर्यावरण शास्त्रज्ञ नॉरमन मायर्स यांच्या अभ्यासानुसार, ज्या ठिकाणी ०.५ टक्के किंवा १५०० विविध प्रकारच्या व्हेस्कुलर वनस्पती आहेत व ‘पर्यावरण-स्त्रोत’च्या इतर अनेक चाचण्यांत जे ठिकाण उत्तीर्ण होते, तो बायो-हॉटस्पॉट! भारतात अशी दोनच ठिकाणे आहेत, एक मुळशी व दुसरे गुजरातमधील आवा. ताम्हिणी घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यालगतची प्लस व्हॅली म्हणजे अनुपम सौंदर्याचा खजिना आहे. याच प्लस व्हॅलीच्या पुढे गेल्यावर दोन आणि चार क्रमांकाच्या दुतर्फा असलेल्या विविध दुर्मिळ वनस्पतींनीयुक्त देवराया, गर्द झाडी, पशू-पक्ष्यांचा किलबिलाट, खळाळणारे ओहोळ आणि कातळांना फुटलेला पाझर पाहून चारचाकी असो अथवा दुचाकी असो, वाहनांचा वेग कमी करायला लावतात. डोंगरवाडी फाटा सोडल्यावर डाव्या बाजूने मान वर करायला लावणाऱ्या सह्याद्रीच्या उंचच उंच डोंगररांगावरून कधी लपेटून लहान बाळाप्रमाणे हळुवार अंगावर खेळणाऱ्या, तर कधी जोरदार मुसंडी मारून, कधी फटकारून जाणाऱ्या धुक्याच्या लाटा पाहिल्या की कॅमेरा बाहेर काढायचा मोह आवरत नाही. गरूडमाची, उंटाची पाठ (कॅमल बॅक) बघायला पर्यटक गर्दी करीत असतात. पांढरेशुभ्र धबधबे, धुके, हिरव्याकंच डोंगररांगा, कातळाला फुटेलेले पाझर, गर्द झाडीतून जाणारा रस्ता, एकीकडे मान वर करायला लावणाऱ्या डोंगररांगा, तर दुसरीकडे कुंडलिका नदीच्या, प्लस व्हॅलीसारख्या खोल दऱ्या, कधी रिमझिमणारा तर कधी जोरदार बरसणारा पाऊस यांचा आनंद घ्यायचा असेल तर मुळशीची ओढ प्रत्येक पर्यटकाला लागलेली असते.
वर्षानुवर्षे बरसलेल्या पावसाने इथली वनसंपदा समृद्ध केली आणि जैवविविधता भरभराटीस आली. बारमाही हिरव्यागार डोंगररांगा, पावसाळ्यातील पांढरेशुभ्र कोसळणारे धबधबे, विविध ठिकाणचे निळेभोर तलाव, धार्मिक स्थळे, गड, किल्ले, देवराई आणि मनाला भुरळ पाडणारी जैवविविधता यांचा सुरेख संगम मुळशीच्या सौंदर्यात भर घालतो. इथल्या पर्यटनाचे वैशिष्ट्य म्हणजे इथला निसर्ग, पशुपक्षी, धार्मिक स्थळे, शेती, डोंगररांगा, देवराई, पौराणिक संदर्भविषयक स्थळे, तसेच किल्ले यांचा बहुआयामी संगम. प्रमुख निसर्ग स्थळांचा विचार केल्यास ताम्हिणी, लवासा, अंबी व्हॅली तसेच भोरदेव आणि तव आदी परिसराचा विचार होतो. या परिसरातील जैवविविधता लक्षणीय असल्याने बाराही महिने इथला परिसर सौंदर्याने नटलेला असतो. कोकण आणि घाटमाथ्यावरच्या सीमेवरचं हे अनुपम सौंदर्याचं ठिकाण म्हणजे ताम्हिणी घाट.
कुंडलिका व्हॅलीचा भाग म्हणजे पिंपरी पॅाइंट. अंधारबनात इथून जावे लागते. धोकादायक आणि सरळसोट कड्यांचा खजिना म्हणजे पिंपरी पॅांईंट. पावसाळ्यात कोकणातून उन्नयनी धरणातून कुंडलिका व्हॅलीकडे झेपावणारे अंगाला झोंबणारे थेट मारा करणारे धुके आणि पाऊस इथे अनुभवायला मिळतो. वनविभागाने अंधारबनसाठी विविध सुविधा उपलब्ध केल्याने पर्यटकांची संख्या खूपच वाढली आहे.
भांबर्डे परिसरात नवरानवरीचा डोंगर, घुटके परिसरातील घटत्कोच आणि हिडिंबाची डोंगररांग आणि बार्पेची देवराई म्हणजे जैवविविधतेचा खजिना. लवासा परिसरातील धामणओहोळ, लिंग्या धबधबा, बॅांबे पॅाइंट, भोरदेव आणि तव म्हणजे अजूनही मानवी हस्तक्षेपापासून काही अंशी शाबूत राहिलेला टापू.
धार्मिक पर्यटन स्थळे
मुठा खोऱ्यातील डावजे येथील नीळकंठेश्वर मंदिर- पायथ्यापासून मंदिरापर्यंत जाण्यासाठी अल्प दरात ट्रॅक्टरची सोय केल्याने ज्येष्ठ नागरिक व भाविकांना लाभ झाला आहे. त्यामुळे इथली पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. पुण्याहून थेट बसची व्यवस्था झाल्याने खारवडे येथील म्हसोबा देवस्थानला भेट देणाऱ्या भाविक
पर्यटकांना लाभ झाला आहे. या परिसरातील भोडे येथील वाघजाई, वांजळे येथील तुळजाभवानी, कोळवण खोऱ्यातील भालगुडी येथील नारायणदेव, हाडशी येथील श्री सत्यसाई पांडुरंग क्षेत्र, वाळेणची वाघजाई, दखणे येथील जाखुबाई, ताम्हिणी व आदरवाडी येथील विंझाई, घोटावडे येथील बापूजीबुवा, मुलखेड येथील खंडोबा, वेगरे येथील कुंडजाई आदी धार्मिक स्थळे आता पर्यटन स्थळे झाली आहेत.
किल्ले
मुळशी परिसरातील तिकोणा, कैलासगड, घनगड, तैलबैल, कोराईगड, मोरगिरी आदी गड किल्ल्यांवर बारमाही भेट देणाऱ्या गडप्रेमींची संख्याही वाढली आहे.
धबधबे
मोसे खोऱ्यातील धामण ओहोळ येथील लिंग्या धबधबा, मुठा खोऱ्यातील वातुंडेमधील आग्या कडा, मुठा येथील धोदनगाय, कांगुरमाळ परिसरातील धबधबे, लवासा परिसरातील घाटरस्त्यातील धबधबे, पिरंगुटमधील उभेवाडीतील इंजाईचा धबधबा, पळसे, आदरवाडीतील तांदळीच्या ओहळातील जुळा धबधबा, पिंपरी पॅाइंट, अंधारबन आदी परिसरातील धबधबे.
लवासातील लिंग्या घाट
लवासा परिसरातील धामणओहोळमधील लिंग्या घाटातील धबधबा आणि बॅांबे पॅाइंट म्हणजे पर्यटकांसह गडप्रेमी आणि ट्रेकर्ससाठी मेजवाणी ठरली आहे. त्यामुळे वर्षा विहाराचा आनंद लुटण्यासाठी हजारो पर्यटकांची पावले लिंग्या घाटाकडे वळायला लागलीत. आभाळ फाटल्यासारखा कोसळणारा पाऊस, ढगांशी लपंडाव खेळणारी सह्याद्रीची रांग घाटावरची बोचरी हवा, कारवीत बुजलेल्या वाटा शोधताना आलेला चकवा आणि त्यातून मिळणारा आनंद अवर्णनीय ठरतो. धामणओहोळ गावाच्या पश्चिमेकडील लिंग्या घाटात सुमारे वीस ते पंचवीस फूट उंचीचा पडझड झालेला आणि मोडकळीस आलेला दगडी सुळका आहे. याच लिंगादेवाच्या खालील उतारावर नयनरम्य, डोळ्यांचे पारणे फेडणारा हा धबधबा आहे. धामण ओहोळपासून घाटापर्यंत दाट धुक्याची दुलई, अंगावर कोसळणारा पाऊस आणि पायवाटेवरील कधी काटेरी तर कधी मुलायम स्पर्शाच्या झाडाझुडपांतून हलकासा चिखल, मुरूम तुडवीत जाणाऱ्या पर्यटकांना इथली वनश्री स्वर्गीय आनंद देते. बोरीचा ओढा ओलांडल्यावर डावीकडील वाट वाघजाई मंदिर आणि बॉंबे पॅाइंटवर जाते. तेथील पठारावरून कुर्डूगड आणि रायगड जिल्ह्यातील निसर्ग न्याहाळता येतो. बॉंबे पॉइंटशेजारीच वीर बाजी पासलकरांच्या वास्तव्यांच्या खुणा असलेला पडझड झालेला वाडा असून तिथे चौथऱ्यांच्या दगडी, घरे, मंदिर आहे. वाघजाई मंदिरापासून खाली कुर्डूगडाकडे व कोकणात उतरण्यासाठी निसणीची वाट सुरू होते. जेथे धबधब्याचे पाणी कोसळते तेथून वरच्या भागाकडे पाहायचे झाल्यास मान मोडायला होते, इतका सरळ रेषेतील उंचावरून हा धबधबा कोसळतो.
पर्यावरणप्रेमी पर्यटकांसाठी देवराया
मुळशीत सव्वाशेहून अधिक देवराया आहेत. त्यातील १) पाळणजाई- घुटके- पिंपरी पॅांइंट सोडल्यावर घनगड व तैलबैलाच्या किल्ल्याकडे जाताना भांबर्डे गावाच्या अलीकडे घुटकेची पाळणजाई ही देवराई आहे. श्रद्धा म्हणा अथवा अंधश्रद्धा म्हणा पण मूल होण्यासाठी या देवराईतील देवाला नवस केला जातो. मूल झाले की देवाला पाळणा अर्पण केला जातो. अतिशय घनदाट झाडी असलेल्या या पाळणजाई देवराईला स्थानिकांनी अद्याप तरी जतन करून ठेवलेले आहे. २) वाघजाई देवीचं बन- मुठा खोऱ्यातील भोडे येथील वाघजाई ही देवराई चाळीस एकरमध्ये पसरलेली असून, सर्वाधिक जैवविविधता या देवराईत आढळते. विशेष म्हणजे गावकऱ्यांनी तिला जिवापाड जपले असून संरक्षण केलेले आहे. ३) आडगावची म्हातोबा देवराई- भांबर्डेच्या अलीकडे ही देवराई असून अतिशय घनदाट झाडी आणि जैवविविधतेची रेलचेल या देवराईत पाहावयास मिळते. इथल्या देवराईतील दाट जंगल, हिरवीगार उंचच उंच झाडी, सोबत निसर्गरम्य वातावरण अशा विविध वैशिष्ट्यांनी युक्त असून पर्यटनाला साद घालत असते. धार्मिक स्थळ आणि निसर्गाचा आल्हाददायी सहवास याचा अनोखा संगम या ठिकाणी पाहावयास मिळतो. दुर्मीळ वनस्पती, प्राणी, वन्यजीव या देवराईंमध्ये आढळतात. पक्षिमित्र, प्राणिमित्र; तसेच वृक्षमित्रांनी इथल्या देवराईंना आवर्जून पाहाव्यात. रणरणत्या उन्हात कोणत्याही वृक्षाखाली तुम्ही बसलात, तर विविध पक्ष्यांचे आवाज तुम्हाला साद घालतात.
घाटवाटा
ताम्हिणी घाट, सावळ्या घाट, सवाष्णीचा घाट, कोराई घाट, वाघजाई घाट, आडदांड घाट, नानदांड घाट, लिंग्या घाट आणि डेऱ्या घाट आदी घाटांशिवाय अन्य आठ ते दहा घाट म्हणजे ट्रेकर आणि पर्यटकांसाठी पर्वणी आहे.
धरण व बंधारे
मुळशी, टेमघर, हाडशी, वाळेण, खांबोली, वरसगाव, टेमघर धरण, हाडशी, वाळेण येथील बंधारे, तसेच अन्य बंधाऱ्यामुळे जलपर्यटन वाढीस लागलेले आहे. इथल्या मुळा व मुठा व वळकी यांसारख्या वर्षभर वाहणाऱ्या प्रदूषणविरहित नद्या म्हणजे इथल्या जीवनवाहिन्या असून समृद्धीचे साधन आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

