कचरा परवडला, पण धूर नको
पिरंगुट, ता. ७ : पिरंगुट (ता. मुळशी) येथील वनालिका गृहनिर्माण संस्थेसमोरील घाट रस्त्यालगतच्या कचऱ्याला लागलेल्या आगीमुळे हा डेपो २४ तास धुमसत आहे. जुलै ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या चार महिन्यांचा कालावधी वगळता कायमस्वरूपी ही आग रोजच सुरू असल्याने रात्रंदिवस सर्वत्र धुराचे लोळ पसरल्याने पर्यावरण आणि रहिवाशांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे येथील नागरिक ‘कचरा परवडला, पण धूर नको’, असे मत व्यक्त करीत आहेत.
गेल्या सुमारे तीन ते चार वर्षे या समस्येमुळे घाट रस्त्यातून प्रवास करणारे पर्यटक, वाहनचालक तसेच स्थानिक नागरिक हैराण झालेले आहेत. ग्रामपंचायतीने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज आहे. ग्रामपंचायतीच्यावतीने घंटागाडीच्या साहाय्याने येथील सरकारी जागेत कचरा साठविला जातो. या कचऱ्यात प्लॅस्टिकचे प्रमाण मोठे असून, त्याला कायमची आग लागलेली असते. त्यातून रात्रंदिवस धुराचे लोळ बाहेर पडत असतात. उन्हाळ्यात उन्हामुळे या धुराची तीव्रता जाणवत नाही. मात्र, सायंकाळी दिवस मावळल्यापासून ते दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजेपर्यंत या धुराची मोठी तीव्रता जाणवते. अलीकडे या धुराचे प्रमाण वाढल्याने भर दिवसाही येथील धुराचे लोळ जाणवतात. वाऱ्याच्या दिशेनुसार हा धूर परिसरातील अनेक गावांपर्यंत पसरतो. येथील कचरा घाट रस्त्यालगतच्या डोंगरात सुमारे एक किलोमीटरच्या परिसरात अस्ताव्यस्त पसरलेला आहे. मात्र, येथील वनालिका संस्थेसमोरील मोठ्या ढीगाला कायमची आग लागलेली असते. येथूनच पुणे-कोलाड हा महामार्ग गेला आहे. नेहरू औद्योगिक वसाहत ते थोरली मोरी या दरम्यानच्या सुमारे दोन किलोमीटर रस्त्यावर रात्रीच्यावेळी धुराचे लोळ थेट पसरलेले असतात.
घनकचरा प्रकल्पातील साठलेला कचऱ्याला बऱ्याच वर्षांपासून वणव्यामुळे आग लागली आहे. ग्रामपंचायतीमार्फत लवकरच या खूप वर्षांपासून असलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येणार असून, तसेच त्यानंतर रोज होणाऱ्या कचरा संकलनावर १०० टक्के प्रक्रिया करून तिथे कचरा साठणार नाही, असे नियोजन केले आहे.
-प्रदीप खरमाटे, ग्रामपंचायत अधिकारी
...तर कायमस्वरूपी तोडगा निघेल
मुळशी तालुक्यात महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळ मान्यताप्राप्त घनकचरा व्यवस्थापन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संस्था आहेत. महानगरपालिका व आजूबाजूच्या अनेक गावातील घनकचऱ्याचे संकलन, वाहतूक, त्यांचे शास्त्रोक्त पद्धतीने खतनिर्मिती व शिल्लक कचऱ्याचे योग्य पद्धतीने विल्हेवाट करणाऱ्या या संस्था आहेत. घनकचरा व्यवस्थापनासाठी अशा संस्थांना पिरंगुट येथील शासकीय मालकीची जागा उपलब्ध केली, तर परिसरातील विविध गावांतील घनकचरा संकलित करून त्याचे शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट करणे शक्य होईल. या जागेतील केवळ १० एकर जागा संबंधित संस्थांना दीर्घ मुदतीसाठी नाममात्र भाडेकरारावर दिल्यास कायमस्वरूपी त्यावर तोडगा निघेल .
05103
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

