आमदार शंकर मांडेकर यांची प्रतिक्रिया
पिरंगुट, ता. २८ : ‘‘विकासाचा रथ थबकला आहे. सध्या काहीही सुचत नाही. दादांच्या अकाली जाण्याने भोर, राजगड, मुळशीच्या विकासाचा रथच थांबला आहे. आम्ही अनेक स्वप्ने पाहिली होती. दादांच्या विश्वासावर ही स्वप्ने पूर्ण होणार होती. आमच्यासारख्या सामान्य कुटुंबातील साध्या कार्यकर्त्यांना आमदार होण्यासाठी दादांचे मोठे योगदान आहे. त्यांच्यामुळेच आम्ही आमदार होऊ शकलो. आमदार झाल्यानंतरही खऱ्या अर्थाने लोकहिताच्या कामांना आणि विकासासाठीची कामे मार्गी लावण्यासाठीची ताकद देण्याचे काम दादांनी केले. जनतेचे प्रश्न मांडत असताना, आम्ही नवीन आमदार आहोत याची जाणीवही होऊ दिली नाही. आमची सगळी कामे त्यांच्या स्वीय सहाय्यकांना सांगून तातडीने मार्गी लावायचे. माणूस म्हणून ‘दादा’ म्हणजे ‘राजा माणूस’. तडकाफडकी रागावणार, पण नंतर शांत होऊन दहा पटीने तेवढीच ताकद देणार. काय बोलावे हेच सुचत नाही. आम्ही ग्रामीण भागातून आमदार म्हणून निवडून आल्यावर विधानभवनात आमचे आवर्जून कौतुक करणारे दादा आम्हाला पोरके करून गेले. ज्यावेळी मी निवडून आलो, त्यावेळी दादा म्हणाले, ‘अरे शंकर, मला जे जमलं नाही ते तू करून दाखवलंस.’ एकदा विकासकामांसाठी दादांकडे गेलो होतो. सगळ्यांसमोर दादांनी सांगितले की, ही कामे होणार नाहीत, त्यावर परत बोलू नकोस. मी दादांच्या केबिनमधून बाहेर आलो आणि मला लगेच पुन्हा त्यांनी बोलावून घेतले आणि त्यांच्या स्वीय सहाय्यकांना सांगितले की, यांची सगळी कामे करून टाका. दादांबद्दल बोलू तेवढे कमीच आहे.
- शंकर मांडेकर, आमदार (भोर, राजगड, मुळशी)

