मुळशीत रोहित्र चोरट्यांचा धुमाकूळ
पिरंगुट, ता. २३ : मुळशी तालुक्याच्या पूर्व भागात रोहित्रांमधील तांब्याच्या पट्ट्या चोरणाऱ्या टोळीने धुमाकूळ घातला असून, गेल्या १० दिवसांत साडेसात लाखांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतीचा वीजपुरवठा खंडित होऊन पिके धोक्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
लवळे येथील गावडेवाडी व राऊतवाडीतील दोन रोहित्रे शनिवारी (ता. १४) फोडण्यात आली. त्यानंतर मंगळवारी (ता. १७) गावडेवाडी व मुलखेड येथील प्रत्येकी १०० केव्हीची रोहित्रे चोरट्यांनी लक्ष्य केली. रविवारी (ता. २२) पुन्हा लवळे येथील मुठा नदीकाठची दोन रोहित्रे फोडून अडीच लाखांचे तांबे चोरले. चोरटे सराईत असून चालू वीज प्रवाहातही पट्ट्या काढण्यात पटाईत असल्याचे दिसून येते. भरे येथील महावितरणचे अधिकारी आनंद घुले, ज्ञानेश्वर धंपलवार यांनी चोरीच्या घटनांची तातडीने दखल घेऊन रात्रीच्या वेळेतही संबंधित ठिकाणी नव्याने पट्ट्या बसवून वीजप्रवाह सुरू करण्याचा प्रयत्न केला; पण चोरीच्या घटनांना आळा घालण्यास महावितरणही हतबल झाली आहे.
लवळे येथील शेतकरी म्हणाले की...
रोहित्र चोरीला गेल्यावर सलग सहा ते सात दिवस वीज मिळत नाही. सध्या कांदा, गहू, ज्वारी, भेंडी, भुईमूग, बाजरी आदी पिके करपू लागली आहेत. ऐन पिकांच्या पाणी देण्याच्या कालावधीत या घटना घडल्याने अन्य शेतकऱ्यांकडे पिकांसाठी पाणी मागण्याची वेळ येत आहे. त्यांच्याही अडचणी वाढल्या आहेत. आम्ही रोहित्रशेजारी झोपून रात्र काढायची का? जिल्ह्यातील भंगाराची दुकाने तपासावीत. हे तांबे मिळाल्यानंतर संबंधित भंगार विक्रेते त्यात मोडतोड करून विल्हेवाट लावण्याची शक्यता असल्याने त्यांचीही चौकशी होणे गरजेचे आहे.
या चोऱ्या मध्यरात्रीनंतर होतात. ज्यावेळी वीज जाईल त्यावेळी शेतकऱ्यांनी तातडीने आमच्या कार्यालयाशी तसेच लगतच्या शेतकऱ्यांशी संपर्क साधला तर चोरटे सापडण्यात काही अंशी मदत होईल. शक्य झाल्यास सीसीटीव्ही लावले तर त्याचाही उपयोग होईल. चोरटे सराईत, चलाख व कुशल असावेत. लवळे येथील रोहित्रांच्या चोरीसाठी मुलखेडमार्गे छोटा टेम्पो घेऊन आल्याच्या काही खुणा सापडल्या आहेत, असे काही शेतकऱ्यांनी सांगितले असून परिसरातील सीसीटीव्हींचा शोध घेणे गरजेचे आहे.
- ज्ञानेश्वर धंपलवार, अधिकारी, महावितरण, भरे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

