

पिरंगुट, ता. १२ : घोटावडे (ता. मुळशी) परिसरात गेल्या पाच ते सहा वर्षांपासून मोकाट रानटी जनावरांनी धुमाकूळ घातला आहे. सातत्याने होणाऱ्या उपद्रवांमुळे शेतकऱ्यांसह ग्रामस्थ हैराण झाले आहेत. ही जनावरे पिके उद्ध्वस्त करीत आहेत. त्यामुळे जनावरांचा बंदोबस्त न केल्यास जलसमाधी आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी येथील रोकडोबा मंदिरात शेतकऱ्यांची तातडीची बैठक पार पडली. यावेळी यावेळी पन्नासहून अधिक शेतकरी तसेच शासकीय प्रतिनिधी उपस्थित होते.
घोटावडे परिसरात सुमारे ३० ते ४० रानटी गुरांचा कळप वावरत आहे. ही जनावरे दिवसा वनविभागाच्या हद्दीत आश्रयाला असतात आणि सायंकाळ होताच शेतात शिरून उभ्या पिकांचा फडशा पाडतात. त्यामुळे आपली पिके वाचवण्यासाठी शेतकरी जीव मुठीत धरून रात्रभर शेतात जागता पहारा देत आहेत. सुमारे दोनशेपेक्षा अधिक शेतकरी या रानटी जनावरांमुळे बाधित झालेले आहेत. या कळपातील काही वळू अत्यंत हिंस्र झाले असून त्यांना हाकलण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांच्या अंगावर ते धावून येत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.
तुकाराम नथू घोगरे म्हणाले, माझ्या साडेतीन एकरांमधील ज्वारीचे उभे पीक या रानटी गुरांनी फस्त केले आहे.
तलाठी रूपाली परिहार म्हणाल्या : शेतकऱ्यांचे अर्ज आले की सर्व जागेवर जाऊन पंचनामा करून तहसीलदारांना अहवाल सादर करणार आहे. तसेच वरिष्ठांच्या आदेशानुसार कारवाई होईल.
त्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्या
- वन, कृषी आणि महसूल विभागाने रानटी जनावरांचा तातडीने बंदोबस्त करावा.
- गुरांना पकडून सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे
- पिकांच्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून आर्थिक मदत मिळावी,
रानटी जनावरांचा त्रास मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रात्री-अपरात्री येऊन शेतातील उभी पिके ही गुरे उद्ध्वस्त करीत आहेत. पिके वाचविण्यासाठी रात्रभर जागून राखण करावी लागत आहे.
- शेखर भेगडे, शेतकरी
दोन हजार एकर क्षेत्र हे घोटावडे गावात या रानटी गुरांमुळे बाधित झाले आहे. त्यामुळे शेतकरी शेती करणे आता सोडून देत आहेत.
- नंदू राजवाडे, शेतकरी, मातेरेवाडी (ता. मुळशी)
शेतकऱ्यांनी काढल्या विक्रीसाठी जमिनी
शरद गोडांबे म्हणाले की, शासनाने जर या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष केले तर आम्ही सर्व शेतकरी जलसमाधी आंदोलन करणार आहोत. या समस्यांना कंटाळून काही शेतकऱ्यांनी जमिनी विक्रीसाठी काढल्या आहेत.
घोटावडे येथील शेतकऱ्यांना उपद्रव देणारे प्राणी हे पाळीव प्राणी आहेत. वनविभाग हा वन्यजीव व वन्य प्राणी यांच्या संरक्षणासाठी काम करीत असतो. त्यामुळे ग्रामस्थांनी मागणी केलेल्या उपद्रवी पाळीव प्राण्यांवर कोणतीही कारवाई करता येत नाही.
- प्रताप जगताप, वनपरिक्षेत्र अधिकारी, भरे
05369, 05371
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.