रोहित्रांवर सीसीटीव्हीची ‘नजर’
पिरंगुट, ता. १६ : मुळशीत वीज रोहित्रांच्या चोऱ्यांमुळे शेतकऱ्यांसह महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारीही हैराण झाले आहेत. त्यावर उपाय म्हणून आता शेतकऱ्यांनीच पुढाकार घेऊन प्रत्येक रोहित्रावर आता सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत. गेल्या आठ दिवसांपासून लवळे येथील राऊतवाडी, गावडेवाडी तसेच मुलखेड परिसरातील विविध रोहित्रांवर आता सीसीटीव्हीची नजर असेल.
रोहित्रांच्या पट्ट्या वेल्डिंग करून पक्क्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे वेल्डिंग केलेल्या आणि सीसीटीव्ही बसविलेल्या रोहित्रांना आता काही प्रमाणात चोरांपासून संरक्षण मिळाले आहे. येथील लवळे, चांदे व मुलखेडमधील शेतकऱ्यांनी सांगितले की, आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे चोऱ्यांपासून बचाव होण्यास मदत होणार आहे.
लवळे, चांदे, नांदे व मुलखेड परिसरातून वाहणारी मुळा नदीवरील रोहित्रांच्या जागा लोकवस्तींपासून दूर अंतरावर आहेत. त्यामुळे चोरांचे फावते. गेल्या सहा महिन्यांत या परिसरातील सहा ते सात रोहित्रांची चोरी झाली आहे. त्यामुळे सुमारे पंधरा ते वीस लाख रुपयांचे नुकसान झालेले आहे. या चोरांना पायबंद घालण्याची मागणी बावधन व पौड पोलिस ठाण्यात निवेदनाद्वारे शेतकऱ्यांनी वारंवार केलेली आहे. मात्र पोलिस ठाण्याला चोरांचा शोध घेण्यात अद्यापही यश आलेले नाही. त्यामुळे चोऱ्यांचे प्रमाण कमी झाले असले तरी त्या घडतच आहेत.
चोरटे सराईत, कुशल तंत्रज्ञ
मुलखेड गावच्या हद्दीत दोन दिवसांपूर्वी आणि चांदे गावाच्या सीमेवर असणाऱ्या आयनळ भागातील रोहित्राची चोरी झाली होती. त्यामुळे चोरटे हे सराईत, कुशल तंत्रज्ञ असावेत शिवाय ते दिवसा या भागातील पाहणी (रेकी) करीत असावेत, अशी शंका शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
लोकवर्गणी काढून सीसीटीव्हीची व्यवस्था
भरे येथील वीज वितरण कंपनीचे अधिकारी आनंद घुले व ज्ञानेश्वर धंपलवार यांनी शेतकऱ्यांना केलेल्या आवाहनानुसार, शेतकऱ्यांनीच पुढाकार घेऊन लोकवर्गणी करून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था केल्याने चोऱ्यांना आळा बसेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
05382
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

