काळदरी खोऱ्यात लावणीची लगबग; खाचरांत पाणी साचल्याने शेतकऱ्यांत समाधान

काळदरी खोऱ्यात लावणीची लगबग; खाचरांत पाणी साचल्याने शेतकऱ्यांत समाधान

Published on

परिंचे, ता.२६ : काळदरी (ता.पुरंदर) खोऱ्यात समाधानकारक पाऊस झाला आहे. यामुळे भात लावणीच्या कामांची लगबग सुरू असून, भात उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सध्या सेंद्रिय पद्धतीने भात उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.
भात लागवडीसाठी चिखलणी, रोप काढणे, भात लावणी आदी कामांची लगबग सुरू आहे. गेल्या पंधरा दिवसांत समाधानकारक पाऊस सुरू झाल्यामुळे संपूर्ण परिसरातील ओढ्या, नाल्यांमध्ये पाणी आले आहे. भात खाचरांमध्ये पाणी साचल्याने भात लावणीची कामे जोमात सुरू असल्याचे शेतकरी स्वागत कोंढाळकर यांनी सांगितले.
भात रोपे टाकण्याच्या वेळी पावसाने दडी मारल्याने भात रोपांच्या उगवण क्षमतेवर परिणाम झाला आहे.प्रत्येक शेतकऱ्याला रोपांची कमतरता भासत असल्याचे धनकवडी येथील शेतकरी संजय ताकवले यांनी सांगितले. मांढर परिसरात बहुतेक भात खाचरामध्ये पाणी साठले नसून, भात रोपे लागणी अवस्थेत आली नसल्याने या परिसरात तुरळक ठिकाणी भात लावणीची कामे सुरू झाली असल्याचे सोसायटीचे अध्यक्ष तानाजी पापळ यांनी सांगितले आहे.

दरम्यान, युनाईटेड वे मुंबई या संस्थेमार्फत राबविण्यात येत असलेल्या अभ्युदय प्रकल्पाअंतर्गत काळदरी परिसरातील शेतकऱ्यांना भात बियाणाचे वाटप करण्यात आले होते. बियाणे पेरून भात रोप तयार झाल्यानंतर दोरीवरील भात लागवडीस सुरुवात केली आहे.
-किरण इंगळे, समन्वयक, अभ्युदय प्रकल्प

भात लावताना भलरीची गाणी
भात लागवड करणे हा आनंदाचा दिवस मानून भात लावताना भलरीची गाणी म्हणत बळीराजाला चांगले उत्पन्न मिळण्यासाठी देवाला विनवणी केली जात असल्याचे भात लागवड करणाऱ्या शेतकरी महिलांनी सांगितले. यावेळी द्वारकाबाई कोंढाळकर, निशा ढवळे, अमृता जानकर, जयश्री जानकर, आशाबाई ढवळे, ताराबाई कोंढाळकर, राजश्री पेटकर, ताराबाई रांजणे, चंद्रभागा कोंढाळकर तसेच संजय हुंबे, अनिल जानकर आदी शेतकरी उपस्थित होते.

02019

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.