
सॅम्बो कुस्ती स्पर्धेत मुळशीला दोन पदके
पौड, ता. ८ : मुळशी तालुक्याला राज्यस्तरीय सॅम्बो कुस्ती स्पर्धेत दोन पदके मिळाली आहेत. पंढरपूर येथे झालेल्या सोलापूर सॅम्बो कुस्ती असोसिएशनच्यावतीने राज्यस्तरीय सॅम्बो कुस्ती स्पर्धेमध्ये पंचावन्न किलो वजन गटात काशिगच्या सार्थक दत्तात्रेय शिंदे याने सुवर्ण, तर कोढांवळेच्या सानिया पप्पू कंधारे हिने रौप्य पदक पटकावले आहे. पुण्याला मिळालेल्या पाच पदकांपैकी दोन पदकांचा मान मुळशीकरांना मिळाला आहे.
या स्पर्धेत अहमदनगर, सांगली, पुणे, परभणी, सोलापूर, नागपूर जिल्ह्यातील कुस्तीगिरांनी सहभाग घेतला होता. हे दोन्ही कुस्तीगीर कुस्तीपटू दत्तात्रेय शिंदे व महाराष्ट्र पोलिस सुरेश मारकड यांच्या नेतृत्वाखाली एमआयटी महाविद्यालय आणि गुलसे तालीम या ठिकाणी सराव करतात. भविष्यात सॅम्बो कुस्तीत राज्यात प्रथम क्रमांकाची अव्वल कामगिरी करण्याचा शिंदे यांनी कंधारे यांनी मानस व्यक्त केला. सानिया ही पत्रकार पप्पू कंधारे यांची कन्या आहे.