नातवाने साकारले दिवंगत आजोबांचे स्वप्न

नातवाने साकारले दिवंगत आजोबांचे स्वप्न

Published on

पौड, ता. १३ : भांबर्डे (ता. मुळशी) येथील प्रज्वल मोहन वायकर हा पहिल्याच प्रयत्नात ‘सीए’ची परीक्षा उत्तीर्ण झाला. कुठलीही शिकवणी न लावता मोबाईल, समाज माध्यमांपासून दूर राहत, अभ्यासात सातत्य ठेवून त्याने चिकाटीने त्याने हे यश मिळवीत दिवंगत आजोबा भांबर्डेचे माजी सरपंच विठ्ठल चिंतामण वायकर व बबन वायकर यांचे स्वप्न पूर्ण केले. मुळशी धरण भागात ‘सीए’ होण्याचा पहिला मान मिळवीत आजोबांची स्मृती अनोख्या पद्धतीने जतन करणाऱ्या या नातवाचे तालुक्यात कौतुक होत आहे.
वडील मोहन हे बारावी शिकलेले असून, आई नीलिमा दहावीपर्यंत शिकलेल्या आहेत. गावाला शेतीव्यतिरिक्त उत्पन्नाचे साधन नसल्याने तसेच मुलांच्या शिक्षणाची गैरसोय असल्याने त्यांनी पुण्यातील कोथरूड भागातील भुसारी कॉलनीत १९९८ मध्ये छोटेखानी दुकान सुरू केले होते. त्यामुळे परिवारासह ते पुण्यात स्थायिक झाले. प्रज्वलचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण भारती विद्यापीठाच्या शाळेत झाले. शाळेतील त्याची हुशारी पाहून त्यावेळी त्याचे आजोबा विठ्ठल वायकर यांनी त्याच्याकडे शिक्षणातून मानाचे पद मिळवून आपल्या घराण्याचे नाव उंचावण्याची इच्छा व्यक्त केली. आजोबांच्या त्या इच्छेपोटी प्रज्वलने दहावीतच सीए होण्याचे ठरविले आणि १२ वीला असतानाच त्यामार्गाने तयारी सुरू केली.
या कालावधीत त्याने स्वतःच्या हौसमोजेला बाजूला ठेवत मोबाईल आणि समाज माध्यमांपासून दूर राहण्याचे ठरविले. खासगी शिकवणीसाठी ये-जा करण्यात वेळ वाया न घालविता त्याने ऑनलाइन पद्धतीने लेक्चर्स ऐकले. वेळेत पेपर सोडविण्याचा सातत्याने सराव केला. आई-वडिलांसह भाऊ प्रतीक, वहिनी श्रद्धा यांनीही त्याला प्रोत्साहन दिले. दरम्यान, बबन वायकर यांचे दोन वर्षापूर्वी तर विठ्ठल वायकर यांचे गतवर्षी आकस्मित निधन झाले. परंतु दोन्ही आजोबांनी जीवनाच्या शेवटच्या क्षणीही प्रज्वलला चांगल्या गुणांनी सीएची परीक्षा उत्तीर्ण होण्याची अपेक्षा केली. त्यामुळे आजोबांच्या निधनाचे दुःख बाजूला ठेवून त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्दीने अभ्यास केला आणि पहिल्याच प्रयत्नात तो सीएची परीक्षा उत्तीर्ण झाला. त्याचा निकाल ऐकून आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तराळले. विठ्ठल वायकर यांच्या पहिल्याच स्मृतिदिनी प्रज्वलने हे यश मिळवीत त्यांना अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिली. त्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मनोरंजनाच्या साधनांपासून दूर राहिल्यास ठरविलेले ध्येय निश्चित पूर्ण होते. ज्या आजोबांनी स्वतःच्या मुलांना स्थिरस्थावर केले. नातवांना उच्चशिक्षित, संस्कारित करण्यासाठी धडपड केली. माझ्याबाबत त्यांनी पाहिलेले स्वप्न मी पूर्ण करू शकलो. याचाच मला मोठा आनंद आहे. मात्र हे यश पाहण्यासाठी ते आमच्यात नाहीत याचेही दुःख आहे.
- प्रज्वल वायकर, सीए

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com