मुळशी तालुक्यात थेट मतदारांची चोरी
पौड, ता. ८ : मुळशी धरण परिसरातील तब्बल ९८८ नावे मतदार यादीतून रहस्यमयरीत्या गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या ऐन निवडणुकीच्या तोंडावर गावच्या मतदार यादीतून नावे वगळून कोथरूडमध्ये समाविष्ट झाल्याने ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दोन दिवसांपूर्वी धरण भागातील ऑनलाइन आपली नावे तपासली असता, ही नावे कोथरूडला समाविष्ट असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी आसपासच्या गावातील कार्यकर्त्यांकडे चौकशी केली असता त्याठिकाणीही नावे गायब झाल्याचे त्यांना समजले. त्यांनी पौडला तहसिल कचेरीत निवडणूक विभागात चौकशी करून गावची मतदार यादी घेतली. अधिकाऱ्यांनीही त्यांना जुन्या याद्या दिल्या. त्यात त्यांचे नाव दिसले, पण अद्ययावत ऑनलाईनमध्ये मात्र त्यांची नावे कोथरूडला जोडल्याचे दिसत होते.
या मतचोरीबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला असून, त्यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. मतदारांना अंधारात ठेवून त्यांचा संविधानाचा हक्क हिरावून घेणारा राजकीय व्यक्ती आणि याकामी त्यांना मदत करणारा निवडणूक अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख सचिन खैरे यांनी केली.
याबाबत कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांशी भेट घेऊन सखोल माहिती घेतली. त्यावेळी ९८८ मतदारांची नावेच गावातून गायब झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. महसूली पुराव्यासह सर्व माहिती नावे वगळलेल्या मतदारांची यादी घेऊन शिवसेनेच्या शिष्टमंडळाने तहसीलदार विजयकुमार चोबे यांची भेट घेतली. विशेष म्हणजे ज्यांची नावे वगळली गेली आहेत, ते सर्व मतदार पिढ्यानपिढ्या गावाला रहायला आहेत. कोथरूडला त्यांचे घर नाही. मतदार यादीतून नाव बदलण्यासाठी त्यांनी कधीही निवडणूक आयोगाचा अर्ज क्रमांक आठ भरला नाही. तरीदेखील या मतदारांना अंधारात ठेवून गावच्या यादीतून त्यांची नावे वगळून ती कोथरूड जोडली.
कोथरूडमधील कार्यकर्ता कोण?
स्वतःच्या राजकीय भवितव्यासाठी गावाकडील मतांची चोरी करणारा कोथरूडमधील कार्यकर्ता नक्की कोण आहे, याचाही शोध घेण्याचे काम शिवसैनिक करीत आहे. तर त्यास मदत करणारा आणि मुळशीकरांच्या हक्कांशी खेळणारा सरकारी अधिकारी कोण असा प्रश्न मुळशीकरांना पडला आहे. यामध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मला मतदानाचा अधिकार मिळाल्यापासून मी निवे गावात मतदान करतोय, परंतु अचानक माझे नाव कोथरूडला असल्याचे ऑनलाइन दिसले. मला न विचारता माझे नाव गावातून कसे गायब झाले? ते कोथरूडला कुणी नेले? हा खोडसाळपणा करणाऱ्या अधिकाऱ्यावर कठोर कारवाई केली गेली पाहिजे. मतदार चोरणे म्हणजे लोकशाहीची क्रूर थट्टा करणे आहे. अशी थट्टा करणाऱ्यावर सरकार कारवाई करणार का?
- दत्ता गोरे, निवे (ता. मुळशी)
गावच्या यादीतून मतदारांची नावे वगळल्याच्या तक्रारी आल्या आहेत. ज्यांची नावे वगळली गेली आहेत, त्यांचा अर्ज क्रमांक सहा भरून घेऊन योग्य ते पुरावे घेऊन ही नावे पुन्हा गावच्या यादीत घेण्याची कार्यवाही करणार आहे.
- विजयकुमार चोबे, तहसीलदार, मुळशी
गावनिहाय गायब मतदार
निवे गावातील तब्बल २३६ मतदारांची नावे गायब झाली. वांद्रे आणि आदरवाडीतील प्रत्येकी १०९ मतदार यादीतून गायब केले. त्याचप्रमाणे बार्पे (९१), वडगाव (५०), वाघवाडी (१५), ताम्हिणी (४४), ढोकळवाडी (३५) अशी यादीतून नाव गायब केलेल्या मतदारांची संख्या आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.