भरमसाठ इच्छुकांमुळे प्रतिष्ठा पणाला
भरमसाठ इच्छुकांमुळे प्रतिष्ठा पणाला
मुळशी पंचायत समितीत सहापैकी पाच गणात अपेक्षित आरक्षण पडल्याने अनेकांनी निवडणुकीसाठी दंड थोपटले आहेत. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या दुफळीमुळे पक्षांची संख्याही वाढल्याने इच्छुकांच्या आशाही उंचावल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकीत उमेदवारांची भरमाळ पाहता पक्षापेक्षा उमेदवाराचे चारित्र्य, जनसंपर्क आणि नात्यागोत्यावरच विजयाचे गणित अवलंबून राहणार आहे. तथापि राज्यात पक्षांच्या होत असलेल्या उलथापालथीमुळे पंचायत समितीची सत्ता मिळविण्यासाठी प्रत्येकाचीच प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
- बंडू दातीर, पौड
मुळशी तालुक्यात पंचायत समितीचे सहा गण असून, सभापतिपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. त्यामध्ये पौड आणि माण गण सर्वसाधारण महीलेसाठी आणि हिंजवडी गण अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव आहेत. अंबडवेट गण नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी, तर पिरंगुट आणि भूगाव हे दोन्ही गण सर्वसाधारण वर्गासाठी खुले आहेत.
सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेत दुफळी झाल्याने दोन्ही पक्षांची ताकद विभागली. सध्या तालुक्यात राष्ट्रवादीच्या अजित पवार पक्षाची ताकद सर्वाधिक दिसून येते. दिड दशकानंतर शंकर मांडेकर यांच्या रूपाने तालुक्याला आमदार मिळाल्याने घड्याळाची टिकटिक वाढली, तर खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठींब्याने मतदारांच्या जोरावर माजी सभापती महादेव कोंढरे यांच्या नेतृत्वाखालील शरद पवार यांची राष्ट्रवादीही तालुक्यात आव्हानात्मक काम करत आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या निष्ठेपोटी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची मशाल पूर्व, पश्चिम पट्ट्यात धगधगत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनाही उचल घेण्यासाठी धडपडत आहे. दिग्गजांच्या प्रवेशामुळे भाजपही तालुक्यात उभारी घेऊ लागला आहे. तर, कॉंग्रेसची ताकद मात्र कमी झाली आहे.
सभापतिपद सर्वसाधारण महिलेसाठी असल्याने पौड आणि माण गणातील लढती महत्वाच्या ठरणार आहेत. दोन्ही गणातील स्वप्नभंग झालेले इच्छुक पुरूष पत्नीच्या रूपाने सभापतिपदाची खुर्ची मिळविण्यासाठी फिल्डींग लावून आहेत. पिरंगुट, भूगावमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार निश्चित झाले असले, तरी अजित पवार यांची राष्ट्रवादी सक्षम उमेदवारांची चाचपणी करीत आहेत. अंबडवेटमध्ये बंडखोरी टाळण्यासाठी अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि ठाकरे यांच्या शिवसेनेपुढे मोठे आव्हान असणार आहे. तर हिंजवडीसाठी सर्वच पक्ष अनुसूचित जातीतील सक्षम महिला उमेदवाराच्या शोधात आहेत.
सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूका लढणार असल्याने प्रत्येकाच्याच अस्तित्वाची लढाई असणार आहे. आमदारकीनंतर पहिलीच निवडणूक असल्याने मांडेकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तथापि, राष्ट्रवादीत इच्छुकांची भरमाळ जास्त असल्याने याठिकाणी बंडखोरांना शांत करण्याचेही कडवे आव्हान मांडेकर यांच्यापुढे राहणार आहे. शरद पवार यांची राष्ट्रवादीही जोर लावून आहे. तालुक्यात ठाकरे यांची शिवसेना शिंदे यांच्या शिवसेनेपेक्षा वरचढ आहे. वेगवेगळ्या कार्यक्रम, आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी जनमाणसात स्थान टिकविले आहे. त्यामुळे त्यांचेही इतरांपुढे कडवे आव्हान असणार आहे. ताकद वाढल्याने भाजप खाते उघडण्यासाठी प्रयत्नशील आहे. शिवसेना (शिंदे) आणि कॉ़ंग्रेसला आपले अस्तित्व दाखवून देण्यासाठी कडवी झुंज द्यावी लागणार आहे. पक्ष आणि इच्छुकांच्या वाढत्या संख्येमुळे यावेळी पक्षापेक्षा उमेदवाराचा गणात असलेला जनसंपर्क, त्याचे चारित्र्य आणि नात्यागोत्यांच्या जाळ्यावरच उमेदवारांच्या विजयाची मदार अवलंबून आहे.
सन २०१७मधील पक्षीय बलाबल
राष्ट्रवादी कॉंग्रेस- चार, शिवसेना- दोन.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

