डिजिटल भूगाव आता एका क्लिकवर
पौड, ता. २८ : मुळशी तालुक्याचे प्रवेशद्वार असलेल्या भूगाव ग्रामपंचायतीचा कारभार आता डिजिटल झाला आहे. ग्रामपंचायतीने स्वतःची अधिकृत वेबसाइट तयार केली आहे. त्यामुळे आता नागरिकांना एका क्लिकमध्ये या गावची संपूर्ण माहिती ऑनलाइन पाहता येणार आहे.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हा महाराष्ट्र सरकारचा ग्रामविकास विभागांतर्गत सुरू केलेला एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. ग्रामपंचायतींना सक्षम करणे, योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधणे हा या पाठीमागचा उद्देश आहे. या उद्देशांना अनुसरून भूगाव ग्रामपंचायतीचे प्रशासक एम. पी. चव्हाण आणि ग्रामविकास अधिकारी जे. एम. भोंग यांनी ग्रामपंचायतीचा सर्व कारभार डिजिटल करण्याचा निर्धार केला. त्यासाठी ग्रामपंचायतीची स्वतंत्र वेबसाइट तयार करण्याची संकल्पना ग्रामसभेत मांडली. ग्रामस्थांनीही त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. अस्पायर टेक्नॉलॉजी सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेला हे काम करण्याचा ठेका दिला. या कंपनीचे संचालक हनुमंत चोंधे हे गावचेच रहिवासी आहेत. त्यांनी संस्थेचे दुसरे संचालक अनिल खजिनकर यांच्या सहकार्याने ग्रामपंचायतीची संपूर्ण अद्ययावत माहिती असलेली वेबसाइट तयार केली. www.grampanchayatbhugaon.com असा या वेबसाइटचा पत्ता आहे. या वेबसाइटचे अनावरण गटविकास अधिकारी सुधीर भागवत यांच्या हस्ते झाले. यावेळी एम. पी. चव्हाण, जे. एम. भोंग, हनुमंत चोंधे आणि ग्रामपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.
वेबसाइटवर मिळेल ही माहिती
ग्रामपंचायतीची प्रशासकीय, भौगोलिक, सांख्यिकी
राज्य सरकार, केंद्र सरकारच्या विविध योजना
विविध योजनांसाठी लागणाऱ्या कागदपत्रे
ग्रामपंचायतीमार्फत राबवल्या जाणाऱ्या सेवा
नागरिकांना येणाऱ्या समस्या नोंदविण्याची सुविधा
सर्व प्रकारचे महत्त्वाचे संपर्क क्रमांक उपलब्ध होणार
ग्रामसभेच्या नोटीस पाहता, वाचता येणार
ग्रामपंचायतीत राबवले जाणारे कार्यक्रम
ऑनलाइन करभरणा सुविधेची सोय
नागरिकांना होणारे फायदे
ग्रामपंचायतीच्या पायऱ्या चढाव्या लागणार नाही
घरात बसून कर भरणा करता येईल
ताटकळत रांगेत उभे राहण्याची कटकट वाचणार
घरबसल्या गावचा कारभार समजणार
थेट तक्रारी नोंदविता येणार
नागरिकांचा वेळ, पैसा, श्रम वाचणार
ग्रामपंचायत कारभार जलद आणि लोकाभिमुख होण्यास मदत होणार
ग्रामपंचायतीला होणारे फायदे
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचे बक्षीस मिळविण्यासाठी गुण वाढणार
कागदाचा खर्च वाचणार
नागरिकांशी समोरासमोर होणारी हुज्जत टळणार
नागरिकांची कामे वेळेत देण्याची कर्मचाऱ्यांना सवय लागणार
दिवसेंदिवस तंत्रज्ञानामध्ये बदल होत चालला आहे. या तंत्रज्ञानाचा ग्रामपंचायतीच्या गतिमान आणि पारदर्शक कारभारासाठी उपयोग व्हावा यासाठी ही वेबसाइट तयार केली आहे. या वेबसाइटमुळे नागरिकांची चांगली सोय होण्यास मदत होणार आहे. ऑनलाइन करभरणा करण्याबरोबरच आपल्या प्रभागातील समस्याही ऑनलाइन मांडता येणार आहे. तसेच यामुळे ग्रामपंचायतीच्या पारदर्शक कारभारातही मदत होणार आहे.
- एम.पी.चव्हाण, प्रशासक, भूगाव
4545

