‘पुणे ग्रॅंड टूर’च्या करंडकाचे मुळशीत जल्लोषात स्वागत
पौड, ता. ७ : ‘पुणे ग्रॅंड टूर’ सायकल स्पर्धेत विजेत्याला दिल्या जाणाऱ्या करंडकाचे मुळशी तालुक्यात विविध ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले. दोन दिवस करंडक आणि त्याचा जल्लोष पाहण्यासाठी गावागावांत ग्रामस्थ, विद्यार्थी यांनी गर्दी केली होती. तालुक्याचा महसूल, पोलिस प्रशासन, क्रीडा विभाग आणि जिल्हा नियोजन समितीच्यावतीने या रॅलीचे नियोजन करण्यात आले होते.
सायकल स्पर्धेचा पहिला टप्पा मंगळवारी (ता. २०) सुरू होत आहे. तालुक्यातील माण येथील टीसीएस कंपनीच्या प्रवेशद्वारापासून या स्पर्धेला सुरुवात होणार असून घोटवडे, अंबडवेट मार्गे पौडला येणार आहे. तसेच पौड-कोळवण मार्गावरून ती काशिगहून मावळ तालुक्यात जाणार आहे. जगातील ४० देशांतील स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होणार आहे.यातील विजेत्या स्पर्धकाला आकर्षक करंडक दिला जाणार आहे. या करंडकाचे दर्शन मुळशीकरांना व्हावे, स्पर्धेची वातावरण निर्मिती व्हावी यासाठी सायकल मार्गावरून मंगळवारी (ता. ५) करंडक रॅली काढण्यात आली. माण येथे करंडकाचे अनावरण केले गेले. सायकल स्पर्धेच्या वातावरण निर्मितीसाठी तयार करण्यात आलेल्या चित्रफीत आणि एलईडी व्हॅनचेही अनावरण झाले. त्यानंतर सायकल मार्गावरून सजवलेल्या वाहनात हा करंडक नेण्यात आला. कार्यक्रमात साहाय्यक पुणे जिल्हा नियोजन अधिकारी किरण देशपांडे, मुळशी तालुका क्रीडा अधिकारी सुरेश काकड, साहाय्यक जिल्हा क्रीडा अधिकारी शिवाजी कोळी, बजाज पुणे ग्रँड टूरच्या समन्वयक श्रेया खळदकर, पौडच्या उपसरपंच प्रीती आगनेन, विद्यालयाचे प्राचार्य संतोष भोकरे, पर्यवेक्षक रमाकांत शिदे, शिक्षक उपस्थित होते. यावेळी देशपांडे, काकड यांनी सायकल स्पर्धेच्या आयोजनाची संकल्पना स्पष्ट केली.मुलांना या स्पर्धेची चित्रफीत दाखविण्यात आली. प्राचार्य संतोष भोकरे यांनी प्रास्ताविक तर पर्यवेक्षक शिंदे यांनी स्वागत केले. यावेळी गुणवंत खेळाडू मनस्वी कांबळे,ओवी भोयणे यांचा सत्कार करण्यात आला.
एकाच टायरवर सायकल चालवीत वेधले लक्ष
घोटवडे, अंबडवेट, दारवली, पौड, चाले येथील प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, गावातील ग्रामस्थ यांनी सायकल मार्गाच्या रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून करंडकाचे स्वागत केले. जागोजागी चित्रफीत दाखविण्यात आली.पौडच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालयातील पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी दारवली फाटा ते शाळेपर्यंत रस्त्याच्या कडेला उभी राहिली होती. मुलींनी करंडकाचे औक्षण केले. यावेळी एकाच टायरवर सायकल चालवीत असलेल्या सायकलस्वाराकडे अनेकांचे लक्ष वेधले गेले. दरम्यान, बुधवारी (ता. ६) कोळवण, हाडशी या गावांमध्ये करंडक रॅली काही काळ थांबली. त्यानंतर काशिगमार्गे ती मावळ तालुक्यात गेली.
4564
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

