‘पुणे ग्रँड टूर’साठी मुळशीकर सज्ज

‘पुणे ग्रँड टूर’साठी मुळशीकर सज्ज

Published on

पौड, ता. १६ : आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित अशा ‘पुणे ग्रँड टूर’ सायकल स्पर्धेसाठी मुळशी तालुक्यातील महसूल व पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. तहसीलदार विजयकुमार चोबे आणि पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या ताफ्यासह स्थानिक स्वयंसेवकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. स्पर्धामार्गावरही पांढरे पट्टे, दिशादर्शक फलकांसह आवश्यक ती दक्षता घेण्यात आली आहे.
या स्पर्धेमुळे भरे फाटा ते अंबडवेटमार्गे पौड रस्ता त्याचप्रमाणे पौड ते काशिगपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या साइडपट्ट्याही मजबूत करण्यात आल्या आहेत. आवश्यक ठिकाणी दिशादर्शक फलकही लावले असून रस्त्यालाही दोन्ही बाजूने पांढरे पट्टे मारले आहेत. वळणावर आवश्यक ठिकाणी लोखंडी बारही टाकण्यात आले आहेत. महसूल, पोलिस, पंचायत समिती प्रशासनाच्यावतीने स्पर्धामार्गावरील गावात अधिकारी जाऊन ग्रामस्थांमध्ये स्पर्धेची वातावरण निर्मिती करीत आहेत. स्पर्धकांना कुठलाही अडथळा होवू नये यासाठी महसूल आणि पोलिस प्रशासनाने सर्व पातळ्यांवर खबरदारी घेतली आहे. मंगळवारी (ता. २०) सकाळी साडेदहा ते तीन वाजेपर्यंत स्पर्धामार्गावरील सर्व वाहतूक बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी साडेदहा पूर्वीच आपल्या नियोजित स्थळी पोचावे असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मंगळवारी पहिल्या स्टेजच्या स्पर्धेला सुरूवात होणार आहे.

स्पर्धेचा मार्ग, विविध गावांत स्पर्धक पोहचण्याची वेळा
माण टीसीएस सर्कलला प्रारंभ - दुपारी १.३०, बापूजीबुवा खिंड १.३४, अंबडवेट कमान १.४२, पौड १.५१, चाले १.५६, नांदगाव १.५८ , कोळवण २.०८, हाडशी बंधारा २.१३, जवण २.१५

स्पर्धेसाठी तैनात फौजफाटा
या स्पर्धेसाठी एक अप्पर पोलिस अधीक्षक दोन पोलिस उपअधीक्षक, चार पोलिस निरीक्षक, २० सहायक पोलिस निरीक्षक, २५० पोलिस अंमलदार आणि ४०० होमगार्ड असा ताफा नियुक्त करण्यात आला आहे. स्पर्धामार्गादरम्यान प्रत्येक १०० फुटांवर तसेच वळणावर पोलिस तैनात असणार आहे. स्पर्धामार्गादरम्यान जाणाऱ्या जोडरस्ते, चौक, गावांना जोडणारे रस्ते, इतर रहदारीची ठिकाणे याठिकाणी ५०० बॅरिकेडस लावले जाणार आहे. तसेच महसूल प्रशासनातील मंडल अधिकारी, तलाठी यांच्या माध्यमातून मार्गावरील माध्यमिक शाळा त्याचप्रमाणे गावागावातील युवकांना प्रोत्साहित करून ७०० स्वयंसेवकांची फौज तयार केली आहे.

नागरिकांनी घ्यावयाची खबरदारी
सकाळी १० वाजण्याच्या पूर्वीच वाहतूक संदर्भातील सर्व कामे उरकून घ्यावीत
चरण्यासाठी सोडलेली जनावरे रस्त्यावर जाणार नाहीत याची खबरदारी घ्या
घरातील पाळीव कुत्री, कोंबड्या, शेळ्या रस्त्याकडे फिरकणार नाही याची काळजी घ्या
दुग्धव्यावसायिकांनी आपला व्यवसाय दहाच्या आत पूर्ण करा
अत्यावश्यक वेळी पर्यायी मार्गाचा वापर करा
प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करा
स्पर्धामार्गावर कुठल्याही प्रकारचा कचरा टाकू नका
वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करा
रस्त्यावर वाहने लावू नका
गावपुढाऱ्यांनी प्रशासनाच्या सूचना वेळोवेळी ग्रामस्थांपर्यंत पोचवाव्यात
स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी उभ्या असलेल्या नागरिकांची काळजी घ्या

स्पर्धकांच्या प्रोत्साहनासाठी असा घ्या पुढाकार
रस्त्याच्या कडेला सुरक्षित अंतरावर उभे राहून टाळ्या वाजवून स्पर्धकांना प्रोत्साहन द्या
ढोल झांज किंवा लेझीम पथकाचे वाद्य तालासुरात वाजवा
आपल्या भारतीय कलासंस्कृतीचे दर्शन घडविणारे सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करा
ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा
कायदा सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्याला प्रतिबंध घाला

जगभरातील ४० देश ही स्पर्धा लाइव्ह पाहणार आहे. त्यामुळे आपल्या भारतीय शिस्तीचे, संस्कृतीचे दर्शन जगाला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे ही स्पर्धा व्यवस्थित पार पाडण्यासाठी लोकांनी सहकार्य करावे. मुळशीकरांनी आपल्या एकजूट, शिस्त आणि उत्साहातून स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे. सायकलपटूंना अडथळा निर्माण करू नका, त्यांना प्रोत्साहित करा.आपल्या कला आणि संस्कृतीचे दर्शन घडेल असे कार्यक्रम सादर करा.
- विजयकुमार चोबे, तहसीलदार, मुळशी


स्पर्धेच्यादिवशी सकाळी दहा ते दुपारी तीनपर्यंत स्पर्धामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद केली जाणार आहे. त्यामुळे त्यापूर्वीच लोकांनी आपली सर्व कामे उरकून घ्यावी. या काळात नागरिकांनी या रस्त्याच्या वाहतुकीसाठी वापर करू नये. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. नियुक्त केलेल्या स्वयंसेवकांनी स्पर्धकांना प्रोत्साहन देण्याबरोबर दर्शकांमध्ये उत्साह आणि शिस्त निर्माण करायची आहे.
- संतोष गिरीगोसावी, पोलिस निरीक्षक, पौड


4583

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com