मुळशीत राष्ट्रवादी, भाजपला बंडाचे ग्रहण
पौड, ता. २१ : मुळशी तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात उमेदवारी वाटपावरून निष्ठावंत समर्थकांमध्ये नाराजी पसरली असून, त्यांनी बंडाचे निशाण फुंकले आहे. भाजपलाही माण- हिंजवडी गटात नाराजीचे ग्रहण लागले आहे.
तालुक्यात जिल्हा परिषदेच्या पौड-अंबडवेट गटात राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून प्रबळ दावेदार असलेले माजी सभापती रवींद्र कंधारे यांची उमेदवारी कापल्याने त्यांच्या समर्थकांत अस्वस्थता पसरली. येथे राष्ट्रवादीकडून मिलींद वाळंज यांना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अविनाश बलकवडे यांना उमेदवारी मिळाली. पिरंगुट-भूगाव गटात दोन्ही राष्ट्रवादीतच निष्ठेची लढाई होणार आहे. येथे ‘घड्याळा’कडून शांताराम इंगवले तर ‘तुतारी’कडून महादेव कोंढरे यांनी एकमेकांच्या विरोधात दंड थोपटलेत. सर्वसाधारणसाठी खुल्या झालेल्या माण- हिंजवडी गटातही भाजपचे शिवाजी बुचडे, राष्ट्रवादीचे सागर साखरे यांच्यात कॉंटे की टक्कर पहायला मिळणार आहे.
पौड आणि माण गणातील विजेता सभापतीच्या सिहांसनाचा मानकरी ठरणार आहे. त्यामुळे दोन्ही गणात सर्व पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पौड गणात ‘घड्याळा’कडून काजल मोरे, ‘तुतारी’च्या कोमल वाशिवले, भाजपच्या पल्लवी कंधारे आणि शिवसेना ठाकरे पक्षाच्या स्वाती ढमाले यांच्यात चौरंगी लढत होईल. माण गणात राष्ट्रवादीच्या मंदा शेळके, ठाकरे शिवसेनेच्या कल्पना भेगडे, शिंदे शिवसेनेच्या पायल रानवडे, भाजपच्या युगंधरा पारखी, कॉंग्रेसच्या सिमा पारखी यांच्यात पंचरंगी ल़ढत रंगेल. अंबडवेट गणात राष्ट्रवादीचे प्रवीण धनवे आणि शिवसेना उबाठाचे सचिन खैरे यांच्यातील लढतही प्रतिष्ठेची ठरणार आहे. अडीच गावांचा असलेल्या पिरंगुट गणातील एकट्या पिरंगुट गावात पाच पक्षांच्या उमेदवारांनी एकमेकाविरोधात दंड थोपटलेत. भूगाव गणात ‘तुतारी’कडून दगडूकाका करंजावणे आणि ‘घड्याळा’कडून राजेंद्र दबडे या दोन्ही राष्ट्रवादीतच लढाई होणार आहे.
एकंदरीत नाराजांचे बंडाचे अस्त्र थंड करण्यात राष्ट्रवादी आणि भाजप किती यशस्वी होतात, यावरच पुढील राजकीय समीकरण अवलंबून आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

