मुळशीत प्रमुख पक्षांची प्रतिष्ठा पणाला
बंडू दातीर : सकाळ वृत्तसेवा
पौड, ता. २७ : मुळशी तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत बंडखोरी थांबविण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला यश आले. त्यामुळे पौड- अंबडवेट गण गटात राष्ट्रवादीच्या ‘घड्याळा’ला शिवसेनेच्या ‘मशाली’बरोबर आणि माण- हिंजवडी गण गटात भाजपच्या ‘कमळा’सोबत लढत द्यावी लागणार आहे. तर, पिरंगुट- भूगाव गण व गटात दोन्ही राष्ट्रवादीत मैत्रीपूर्ण लढत होत आहे. त्यामुळे मुळशीत दोन्ही राष्ट्रवादीसह शिवसेना ठाकरे आणि भाजप यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
पौड- अंबडवेट गटात राष्ट्रवादी अजित पवार पक्षातून मिलिंद वाळंज यांना उमेदवारी मिळाली. त्यामुळे माजी सभापती रवींद्र कंधारे यांनी समर्थकांसमवेत बंडाचे निशाण फुंकले होते. त्यामुळे येथील घडामोडीकडे तालुक्याचे लक्ष लागले होते. तथापि कंधारे यांना थांबविण्यात पक्षश्रेष्ठींना यश आले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अविनाश बलकवडे यांचे कडवे आव्हान त्यांच्यासमोर आहे. पौड गणात राष्ट्रवादीच्या काजल मोरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कोमल वाशिवले, भाजपच्या पल्लवी कंधारे आणि शिवसेना ठाकरे पक्षाच्या स्वाती ढमाले, शिवसेनेकडून स्वाती वाशिवले यांच्यात लढत होईल. तर, अंबडवेट गणातही चेतन फाले, सचिन अमराळे यांची नाराजी दूर झाल्याने, तसेच इतर इच्छुकांनी राष्ट्रवादीचे प्रविण धनवे यांना पाठींबा दिला. येथे धनवे यांचा सामना शिवसेना ठाकरे पक्षाचे सचिन खैरे यांच्याशी होणार आहे.
पिरंगुट- भूगाव गटामध्ये राष्ट्रवादीचे शांताराम इंगवले, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे महादेव कोंढरे, शिवसेना ठाकरे पक्षाचे माधवराव शेळके व भाजपकडून भानूदास पानसरे हे आपले नशीब आजमावत आहेत. पिरंगुट गणातील अडीच गावातील अर्धे गाव असलेल्या एकट्या पिरंगुटमध्ये पाच उमेदवार आहेत. त्यात घड्याळाचे रमेश पवळे आणि तुतारीकडून राहूल पवळे अशी भावकीचीच लढाई असून, याच गावातील महेश वाघ भाजपकडून, रामदास गोळे ठाकरे शिवसेनेकडून, सौरभ निकटे यांनी मनसेकडून दंड थोपटले आहे. शिंदे शिवसेनेकडून शैलेश पांढरे नशीब आजमावित आहेत. भूगाव गणातही दोन्ही राष्ट्रवादीत सामना होत आहे. येथे ‘तुतारी’कडून दगडूकाका करंजावणे आणि ‘घड्याळा’कडून राजेंद्र दबडे यांच्यात लढत होत आहे. ‘तुतारी’कडून उमेदवारी न मिळाल्याने ‘मशाली’वर निवडणूक लढविणारे अनिल पवार यांनीही प्रतिष्ठा पणाला लावली आहे.
माण- हिंजवडी गट सर्वसाधारण आहे. याठिकाणचे पूर्वाश्रमीचे कॉंग्रेसचे नेते व कार्यकर्ते भाजपत गेले आहेत. येथे ‘कमळा’कडून शिवाजी बुचडे आणि ‘घड्याळा’कडून सागर साखरे यांच्या टक्कर पहायला मिळणार आहे. माण गणात मात्र भाजपमध्ये बंडखोरी झाली. येथे भाजपकडून युगंधरा पारखी आणि रूपाली बोडके दोघींनी एबी फॉर्म दिला गेला होता. मात्र, पारखी यांचा एबी फॉर्म वैध धरला. त्यामुळे बोडके यांनी बंडखोरी केली. ‘घड्याळा’कडून मंदा शेळके, शिवसेना ठाकरे पक्षाकडून कल्पना भेगडे, शिंदे शिवसेनेकडून पायल रानवडे, तर कॉंग्रेसकडून सिमा पारखी यांच्या लढत होत आहेत. हिंजवडी गणातही भाजपच्या ऐश्वर्या वाघमारे आणि राष्ट्रवादीच्या निकीता वाघमारे या भावकीतच लढत होत आहे. येथे सई जाधव ‘धनुष्यबाणा’कडून, निशा सपकाळ ‘मशाली’कडून नशीब आजमावत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

