मुळशीच्या विकासाची दादांशी ‘नाळ’
पौड, ता. २८ : मुळशी तालुक्याशी अजितदादांचे कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध होते. तालुक्यात विकासाची मोट बांधण्यासाठी त्यांनी निधीबाबत कायम मुळशीला झुकते माप दिले. त्यांच्या पुढाकारामुळेच मुळशी तालुक्याचे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागले. त्यामुळेच मुळशीच्या विकासाचे खरेखुरे दादा म्हणून तालुक्याच्या कानाकोपऱ्यात अजितदादांची ओळख निर्माण झाली.
अजितदादा मुळशी तालुक्यात १९९२मध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराचा प्रारंभ करण्यासाठी आले होते. त्यावेळी ते राज्याचे कृषिमंत्री होते. तिथूनच त्यांची मुळशीकरांशी नाळ जोडली गेली. गेल्या तेहेतीस वर्षात मुळशीच्या विकासाची अनेकविध कामे त्यांनी मार्गी लावली.
भरे पुलाची उभारणी
२००६मध्ये पावसाळ्यात मुळा नदीवरील भरे पूल कोसळला होता. त्यामुळे मुळशी तालुक्याचा घोटावडे, रिहे आणि हिंजवडी खोऱ्यातील विविध गावांचा संपर्क तुटला होता. दळणवळण ठप्प झाले होते. याची माहिती मिळाल्यानंतर दादांनी तातडीने नवीन पुलासाठी निधी मंजूर केला. त्यामुळे वेगाने या पुलाचे बांधकाम झाले. मुळशीकरांच्या वाहतुकीची मोठी गैरसोय दूर झाली.
पंचायत समिती इमारत
मुळशी तालुक्यातील पंचायत समितीचे कामकाज चालणाऱ्या पौड येथील इमारतीची दुरवस्था झाली होती. इमारत जीर्ण झाली होती. २०१०मध्ये या इमारतीची पाहणी केल्यानंतर दादांनी नव्या इमारतीच्या बांधकामासाठी तातडीने निधी मंजूर केला. त्यामुळे अवघ्या वर्षभरातच नवी इमारत उभी राहिली. त्याचे उद्घाटनही अजितदादांच्या हस्ते झाले.
मुळशी प्रादेशिकची वाढीव लोकवर्गणी माफ
तालुक्यातील २१ गावे आणि वाड्यावस्त्यांवर पाणीपुरवठा करणाऱ्या मुळशी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेची पायाभरणी अजितदादा पवार यांच्या हस्ते झाली. २०११मध्ये मुळशीकरांची जीवनवाहिनी असलेल्या या योजनेसाठी ९२ लाख रुपयांची वाढीव लोकवर्गणी भरण्याबाबत पाणीपुरवठा विभागाने कळविले होते. त्यावेळी मुळशीच्या शिष्टमंडळाची अजितदादांनी तत्कालीन पाणीपुरवठा मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्याबरोबर बैठक घडवून आणली. या बैठकीमध्ये त्यांनी वाढीव लोकवर्गणी माफ करण्याची सूचना केली. त्यामुळे ही वाढीव लोकवर्गणी तात्काळ माफ झाली. योजना तातडीने कार्यान्वित झाली. आज तालुक्यातील २१ गावे आणि वाड्या वस्तीवरील हजारो नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न केवळ दादांच्या सकारात्मक पुढाकाराने मार्गी लागला.
शिक्षणाची सोय
तालुक्यात पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या पौड, कोळवण, घोटावडे, मुठा, शेरे, पिरंगुट या सहा ठिकाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आहेत. अजितदादांनी सहाही शाळांच्या अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त इमारती बांधल्या. तालुक्यात महाविद्यालयाची सुविधा नव्हती. ही बाब लक्षात घेऊन अजितदादांनी पुढाकार घेऊन पिरंगुट येथे अनंतराव पवार कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय सुरू केले. त्यामुळे मुळशीच्या कानाकोपऱ्यातील हजारो युवा विद्यार्थ्यांची महाविद्यालयीन शिक्षणाची सोय झाली.
दृष्टीक्षेपात
-भरे येथील क्रीडासंकुल उभारणीत सिंहाचा वाटा
-श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याला बळ
-को-जन प्रकल्पासाठी लागणारा निधी तात्काळ मंजूर
-मुळशी धरणग्रस्तांच्या सोयीसाठी माले येथे आरोग्य उपकेंद्राची इमारत उभारली
-तहसील कचेरीच्या इमारतीसाठीही अजितदादांच्या माध्यमातून निधी
-तालुक्यातील विविध गावांना जोडणारे मुख्य रस्ते, अंतर्गत रस्त्यांचे मजबुतीकरण
-अनेक गावातील पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास
-आदिवासी वाडीवस्तीवर दुर्गम ठिकाणी वीज पोचवली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

