पिरंगुट गटात इंगवले यांचा दुसऱ्यांदा झेंडा

पिरंगुट गटात इंगवले यांचा दुसऱ्यांदा झेंडा

Published on

पौड, ता. १३ : मुळशी तालुक्यातील पिरंगुट- भूगाव गटातील चुरशीच्या लढतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शांताराम इंगवले सलग दुसऱ्यांदा विजयी झाले. ते जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे प्रमुख दावेदार ठरले आहेत. वयाने ज्येष्ठ, अनुभवी आणि पक्षहितासाठी नेहमीच लवचिक भूमिका घेणारे इंगवले यांना दिवंगत अजित पवार यांनी दिलेला अध्यक्षपदाचा शब्द पूर्ण होणार का, याकडे मुळशीकरांचे लक्ष लागले आहे.
पिरंगुट- भूगाव गटात राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून इंगवले, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून महादेव कोंढरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आबासाहेब शेळके व भाजपकडून भानूदास पानसरे मैदानात होता. त्यात इंगवले यांना ११ हजार १४१, कोंढरे यांना ९७५७, शेळके यांना ९२३३, पानसरे यांना १९३७ व मरगळे यांना ४९८ मते मिळाली. त्यात इंगवले १३८४ मतांच्या फरकाने विजयी झाले. ते गेली चाळीस वर्षापासून मुळशी तालुक्याच्या राजकारणात सक्रिय आहेत. प्रथमपासून ते पवार परिवाराशी बांधिलकी ठेवून एकनिष्ठ राहीले. त्यांनी तालुक्यात विकासाची कामे करीत राष्ट्रवादीचे पक्ष संघटनही मजबूत केले.
त्यांनी सन २००४मध्ये विधानसभेसाठी उमेदवारीची मागणी केली होती. त्यावेळी अजित पवार यांनी त्यांची समजूत काढली. त्यानंतर सन २०१२ ते २०१७ या काळात ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले होते. ते जिल्हा परिषदेचे गटनेतेही झाले होते. त्यावेळी शेवटच्या अडीच वर्षातील सव्वा वर्षे त्यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद देण्याचे सर्वानुमते ठरले होते. मात्र, त्यावेळच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले नाहीत. त्यामुळे त्यांची संधी हुकली. गतवर्षीही झालेल्या विधानसभा निवडणुकीत इंगवले यांनी उमेदवारीची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील, तो ही मान्य करीत शंकर मांडेकर यांच्या प्रचारासाठी मेहनत घेत विजय मिळवून दिला.

यावेळी तरी संधी मिळणार का?
यावेळच्या निवडणुकीत इंगवले यांनी ज्यावेळी मुलाखतीदरम्यान अजित पवार यांनी, ‘यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी तुमचा विचार केला जाईल,’ असा शब्द त्यांना आणि त्यांच्या समर्थकांना दिला. त्यामुळे इंगवले यांनीही जोरदार प्रचार करीत विजयश्री खेचून आणली. आतापर्यंत त्यांनी पक्षहितासाठी वादविवाद किंवा मतभेद नको म्हणून नेहमीच चार पावले मागे येत लवचिक भूमिका स्वीकारली. सध्या जिल्हा परिषदेवर निवडून आलेले ते ज्येष्ठ आणि अनुभवी सदस्य आहेत. त्यामुळे यावेळी त्यांना अध्यक्षपद देवून दिवंगत अजित पवार यांनी दिलेला शब्द पूर्ण व्हावा, अशी मागणी मुळशीकरांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com