मुळशीत अवैध गौण खनिज वाहतुकीवर कारवाई
पौड, ता. १८ : मुळशी तालुक्यात अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या पाच डंपरवर तहसीलदार विजयकुमार चोबे यांनी कारवाई केली. या डंपरमालकांना १२ लाख ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून, विनापरवाना वाहतूक केल्यास कठोर कारवाईचा इशारा चोबे यांनी दिला.
तालुक्यातील पूर्व भाग आणि हिंजवडी परिसरात मोठ्या प्रमाणावर शहरीकरण व उत्खनन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर तहसीलदार चोबे यांनी स्वतः रस्त्यावर उतरून गस्ती पथकासह ही कारवाई केली. यामध्ये (एमएच १३ केए ६६११, एमएच १४ केयु ७६९०, एमएच १४ एनबी ९७९२, एमएच ५० -१४५३ आणि एमएच १४ एलएल ५५५३) या पाच डंपरचा समावेश आहे. अवैध वाहतुकीमुळे होणारे अपघात आणि पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली. वाहतूकदारांनी सरकारी परवानगी घेऊन आणि ईटीपी परवाना सोबत ठेवूनच नियमानुसार वाहतूक करावी, अन्यथा यापुढेही अशा कारवाया सुरू राहतील, असे तहसीलदार चोबे यांनी स्पष्ट केले. या कारवाईमुळे अवैध गौण खनिज वाहतूकदारांचे धाबे दणाणले आहेत.
4709

