
पांडुरंग राऊत यांचा ‘डी.लिट.’ने सन्मान
राहू, ता. २४ : पाटेठाण (ता. दौंड) येथील श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे अध्यक्ष पांडुरंग आबाजी राऊत यांना अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाची डॉक्टर ऑफ लेटर्स डी.लिट. पदवी विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. अजिंक्य डी. वाय. पाटील, कुलगुरू डॉ. विजय डी. पाटील यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आली.
राऊत यांच्यामुळे श्रीनाथ म्हस्कोबा उद्योग समूहाने अल्पावधीत मिळविलेले यश आणि ‘शेतकरी उद्योजक झाला पाहिजे’ ही भूमिका तसेच साखर उद्योगाच्या व शेतकरी बांधवांच्या विकासाकरिता केलेल्या सर्वोत्तम कार्याची दखल घेतली.
या वेळी राऊत म्हणाले, ‘‘साखर उद्योग हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. काळानुरूप बदल करत जागतिक स्पर्धेत उतरणे गरजेचे आहे. प्रत्येक माणसाने आपल्या आवडत्या क्षेत्रात ध्येयवेडे होऊन काम केले पाहिजे. कारखान्याचे वटवृक्षात रूपांतर होण्याचे श्रेय हे फक्त माझे एकट्याचे नसून सर्वांचे आहे.
राऊत यांना आजवर मिळालेले पुरस्कार
२००६ मध्ये राष्ट्रीय रतन पुरस्कार, २०१० मध्ये भारत गौरव पुरस्कार, २०१३ मध्ये उद्योगश्री गौरव पुरस्कार, २०१९ मध्ये सकाळ एक्सलन्स, बेस्ट शुगर फॅक्टरी व बेस्ट डिस्टिलरी त्याचबरोबर २०१९ मध्ये व २०२० मध्ये साखर उद्योगाच्या विकासाकरिता कार्य करणाऱ्या दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन (DSTA) पुणे व शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया (STAI) नवी दिल्ली या दोन्ही संस्थांतर्फे जीवनगौरव पुरस्कार.