राहू परिसरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट
राहू , ता. ६ : राहू (ता. दौंड) येथील राहू- वाघोली रस्त्यावरील सोनवणे डेअरी फार्म परिसरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. पंधरा ते २० कुत्र्यांची टोळकी नेहमीच रस्त्यावर फिरत असल्याने शाळेला जाणारी मुले, महिलांसह ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
राहू ग्रामपंचायतींसह पशुसंवर्धन विभागाने मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थ करत आहे.
या परिसरात म्हशींचे गोठे आहेत. या ठिकाणी मृत्युमुखी पडलेली लहान जनावरे जास्त प्रमाणात आणून टाकली जातात. मांस खाण्यासाठी राहू- वाघोली रस्त्यावर मोकाट कुत्री टोळक्याने फिरत असतात. कुत्र्यांचा दुचाकीसह, सायकलस्वारांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो. कुत्री त्यांच्यावर धावून जातात किंवा आडवी पळतात. त्यामुळे अनेकदा किरकोळ अपघात झाले आहेत. काहींना अपंगत्व आले आहे.
ग्रामपंचायत स्तरावर मोकाट कुत्र्यांची नसबंदी करण्याबाबत कोणतीही व्यवस्था नाही. तरीही त्याबाबत जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभाग, वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जातील.
-प्रकाश जाधव, ग्रामसेवक, राहू
परिसरात नेहमीच दुर्गंधी पसरलेली असते. रस्त्याच्या कडेला शेणाच्या राड्यांमुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. रस्त्याच्या कडेला दलदल आहे. येथील भटक्या कुत्र्यांमुळे दुचाकी घसरण्याचे प्रमाण वाढले आहे. संबंधित विभागाने कडक कारवाई करावी.
- विठ्ठल थोरात, सामाजिक कार्यकर्ते
03470