शेलार मेमाणवाडी शाळा चार दिवसांपासून बंदच
राहू, ता.२५ : मिरवडी जवळील शेलार मेमाणवाडी (ता. दौंड) येथील शाळेतील दोन शिक्षकांना शनिवारी (ता. २२) कार्यमुक्त करून वडगाव बांडे (ता. दौंड) शाळेत (ता. २४) पासून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने रुजू करण्यासंदर्भात केलेल्या पत्र व्यवहाराच्या निषेधार्थ (ता. २२) पासून शेलार मेमाणवाडी येथील ग्रामस्थ व पालकांनी शाळा बंद आंदोलन सुरू ठेवले आहे. जोपर्यंत जिल्हा परिषदेचा शिक्षण विभागाचे अधिकारी विद्यार्थी पालक व ग्रामस्थांच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही शाळा सुरू करू देणार नसल्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे पालकांनी सांगितले.
मागील पाच वर्षांच्या काळात बंद अवस्थेच्या मार्गांवर असणाऱ्या दहा पटसंख्या असणारी शाळा पालक व ग्रामस्थ यांच्या मदतीने लोकसहभागातून २०० मुलांच्या उंबरठ्यावर पोचवली. शाळेमध्ये शाळेची भौतिक सुविधा, शाळेची जागा व नावीन्यपूर्ण उपक्रमांसाठी लागणारी आवश्यक भौतिक साधने अशी एक कोटी रुपयांच्या आसपास कामे शासनाच्या कोणत्याही मदतीविना शिक्षक व ग्रामस्थांच्या पुढाकारातून प्राप्त केली. पाचवी ते सातवीचे वर्ग मोठ्या कष्टाने सुरू केले. शाळेची शैक्षणिक गुणवत्ता अनेक स्पर्धांमध्ये महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर पोचली. शाळेचा एक विद्यार्थी पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दिल्ली येथे जाऊन राष्ट्रपती यांची भेट घेऊन आला. शाळेची एक मुलगी अमेरिका येथे शासनाच्या वतीने नासा येथे अभ्यास दौऱ्यावर असताना ती परतण्यापूर्वीच येथील शिक्षकांची बदली झाली आहे. दरम्यान, प्रशासनाने दिलेल्या शब्द व आपली जबाबदारी झटकून पुन्हा एकदा ग्रामस्थ व शाळा यांच्या मागणीचा कोणताही विचार न करता खेडेकर दांपत्य या शिक्षकांना वडगाव बांडे येथे रुजू होण्यासंदर्भात पत्रव्यवहार केल्याचे शेलार मेमाणवाडी येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
आमची मुले इंग्रजी माध्यमातून काढून मराठी माध्यमाच्या शाळेत टाकली. शाळेला ग्रामस्थांनी भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या. संबंधित शिक्षक दांपत्यांनी नावीन्यपूर्ण उपक्रमांमध्ये कोडिंग, स्क्रॅचिंग,वेब डेव्हलपमेंट जर्मन भाषा बोलणे, अबॅकस,अलेक्सा अशा तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून सुरू केले. ग्रामस्थांच्या मागणीनुसार पुढील किमान दोन वर्षांसाठी हे शिक्षक शाळेत राहणे अत्यंत गरजेचे आहे. जोपर्यंत प्रशासनातील अधिकारी तोडगा काढण्यासाठी शाळेत येणार नाही. तोपर्यंत शाळा बंद आंदोलन सुरू राहील.
- सागर शेलार, माजी सरपंच
शासनाच्या नियमानुसार शिक्षकांच्या ऑनलाइन बदली प्रक्रिया संपूर्ण राज्यामध्ये राबवली आहे. प्रशासनाला ग्रामस्थांनी वेठीस धरू नये. शाळा बंद ठेवून विनाकारण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करू नये. जिल्हा परिषदेकडून शेलार मेमाणवाडी शाळेत शिक्षकांची नियुक्ती केली आहे. पालकांनी विरोध करू नये. पालकांनी सहकार्याची भूमिका ठेवून संबंधित शिक्षकांना रुजू करून घ्यावे.
- संजय महाजन, गटशिक्षणाधिकारी, दौंड
3587
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

