चांडोली येथील खूनाचा उलगडा

चांडोली येथील खूनाचा उलगडा

Published on

राजगुरुनगर, ता. २६ : बहिणीची छेड काढतो म्हणून पाच जणांनी मिळून त्याच परिसरात राहणाऱ्या तरुणाचा खून केल्याचे खेड पोलिसांनी तपासात निष्पन्न केले असून, मोशी येथील दोन आरोपींना अटक केली आहे, तर तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. स्वप्नील अशोक इंगुले (वय २२, मूळ रा. नांदेड, सध्या रा. भीमनगर, लक्ष्मीनगर, मोशी), असे खून झालेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (ता. २३) दुपारी खेड तालुक्यातील चांडोली येथील फळरोपवाटिकेत एका तरुणाचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत सापडला होता. त्यानंतर खेड विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली खेडचे पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी तपास पथके तयार करून तपासाच्या सूचना दिल्या. कुठलाही पुरावा मागे नव्हता. मृताच्या वर्णनाशी मिळताजुळता कोणीही खेड तालुक्यातील कुठल्याही पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार नव्हती. त्यामुळे खेड तालुक्याबाहेरील तो असावा, असा कयास केला. मात्र, त्याबरोबरच मृतदेह सापडलेले फळरोपवाटिकेचे ठिकाण संबंधितांना माहीत असावे, असा ठोकताळा बांधून तपास केला. रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासले व शिरोली आणि मोशी अशा दोन्ही ठिकाणी राहणाऱ्या एका किरकोळ चोरट्यावर लक्ष केंद्रित केले. गुप्त खबऱ्याकडून माहिती काढली आणि अंदाज आल्यावर पाच संशयित आरोपींना ताब्यात घेतले. शुभम अजय कांबळे (वय २४) व सिराज अब्दुल सलाम (वय २२, दोघेही रा. भीमनगर, लक्ष्मीनगर, मोशी) व तीन अल्पवयीन यांनी मिळून खून केल्याचे त्यांनी कबूल केले.
खून झालेला इंगुले हा संशयित आरोपींपैकी दोघांच्या बहिणीची छेड काढतो व आईला अश्लील भाषेत बोलतो, म्हणून त्यांच्या मनात राग होता. मृतासह सहाजण रविवारी मोशीहून रिक्षात बसून दारू पीत चांडोली येथील फळरोपवाटिकेत आले. तेथे पाच जणांनी इंगुले याचा डोक्यात दगड घालून खून केला.
याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केलेला होता. त्यानुसार संशयित आरोपी शुभम कांबळे व सिराज सलाम यांना अटक केली. न्यायालयाने त्यांना २९ जुलैपर्यंत पोलिस कोठडी दिली असून, इतर तीन अल्पवयीन मुलांना पुणे येथील बालन्यायालयात हजर ठेवण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.