वीज वितरणच्या कार्यालयात घुसला बिबट्या

वीज वितरणच्या कार्यालयात घुसला बिबट्या

Published on

राजगुरुनगर, ता. १० : चांडोली (ता. खेड) येथे गेल्या चार पाच दिवसांपासून वावरत असलेला मादी बिबट्या बुधवारी (ता. १०) राजगुरुनगर उपविभाग महाराष्ट्र वीज वितरण मंडळ कार्यालयाच्या एका खोलीत घुसला यामुळे मोठी खळबळ उडाली. मात्र वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधानाने त्याला खोलीत कोंडले. नंतर वनविभागाने केलेल्या चार तासांच्या सुटका मोहिमेत त्याला जेरबंद करण्यात आले.

चांडोली येथे महाराष्ट्र वीज वितरण कंपनीच्या राजगुरुनगर उपविभागाचे कार्यालय व कर्मचारी सदनिका आहेत. या आवारात एका कडेच्या खोलीत मीटर तपासणी विभाग आहे. येथे शांता शेळके या तंत्रज्ञ टेबलावर काम करत होत्या. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास त्या खोलीत बिबट्या घुसला. बिबट्या खोलीकडे जाताना पाहून बाहेरच्या एका कर्मचाऱ्याने आरडाओरडा करून शेळके यांना बिबट्या खोलीत घुसल्याची सूचना दिली. तेव्हा त्यांनी बाजूला वळून पाहिले तर तो आरामात त्यांच्या शेजारुन जाऊन मागच्या बाजूच्या निकामी खोक्यांच्या आडोशाला लपला. शेळके शिताफीने बाहेर पडल्या व दाराला कडी घातली. नंतर शटर व लोखंडी गेटही लावण्यात आले आणि बिबट्या खोलीत कोंडला गेला. तोपर्यंत बाहेर गदारोळ झाला होता. बघ्यांची गर्दी जमली. बिबट्या खोलीत बंद असल्याने धोका नव्हता.

अनऊ सर्वांनी टाकला निःश्वास
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी व त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पिंजरा आणला. तसेच माणिकडोह येथून बिबट्या जेरबंद करण्यासाठी पथक बोलावले. एक तासात ते हजर झाले. त्यांच्याबरोबर ‘डार्ट’ मारणारा बंदुकधारी होता. लोखंडी गेटच्या बाहेरून बांबूने आतील शटर व दार उघडले. मागच्या खिडकीतून बांबूच्या साहाय्याने वन‌ कर्मचाऱ्यांनी त्याला हुसकावले. त्याने गुरगुरत लोखंडी गेटवर झेप घेतली. पुन्हा मागे फिरला. संधी साधून बंदुकधारी नेमबाजाने बिबट्याला ‘डार्ट’ मारला. अर्ध्या तासात तो भुलला. सर्व खबरदारी घेऊन वनविभागाच्या पथकाने खोलीतून त्याला पिंजऱ्यात टाकले. सर्वांनी निःश्वास टाकले.‌ तेथून टेम्पोने पिंजरा माणिकडोह येथे बिबट निवारा केंद्रात नेण्यात आला.

जेरबंद झालेला बिबट्या चार पाच वर्षांची मादी आहे. तिच्याबरोबर अजून बिबटे आहेत का? याचा शोध ड्रोनद्वारे वनविभाग घेत आहे, मात्र अद्याप तसे आढळले नाही,
- प्रदीप रौंधळ, वनपरिक्षेत्र अधिकारी

03083

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.