वाहतूक कोंडीविरोधात 
याचिका दाखल करणार

वाहतूक कोंडीविरोधात याचिका दाखल करणार

Published on

राजगुरुनगर, ता. ४ : पुणे- नाशिक महामार्ग आणि तळेगाव- चाकण- शिक्रापूर रस्त्यावर सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडी विरोधात, खेड वकील बार असोसिएशन उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार आहे, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. वैभव कर्वे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पुणे- नाशिक आणि तळेगाव- चाकण-शिक्रापूर महामार्गावर सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे लोक हैराण झाले आहेत. वाहनचालकांना या रस्त्यांवर तासनतास अडकून राहावे लागते. साधारण तासाभरात होणाऱ्या पुणे- राजगुरुनगर प्रवासाला आता अडीच तीन तासही लागू शकतात, अशी परिस्थिती आहे. तळेगाव- चाकण अंतर अवघे २२ किलोमीटर असताना प्रवासाला दीड- दोन तास लागतात. वाहतूक कोंडीबरोबर रस्त्यांचीहीची दुरवस्था आहे. खराब रस्त्यांमुळे आणि बेशिस्त वाहनचालकांमुळे अपघातांची संख्या वाढली आहे. या अपघातांमुळे अनेकांना जीव गमवावे लागले आहेत. लोकांचा संताप वाढला की सरकारकडून तात्पुरत्या स्वरूपाच्या उपाययोजना केल्या जातात.
आता याप्रकरणी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी खेड वकील बार असोसिएशनने पाऊल उचलले असून, असोसिएशन उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार आहे. या महामार्गांवरील वाहतूक कोंडी आणि अपघातांमुळे स्थानिक नागरिक, प्रवासी आणि व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाकडून वारंवार निवेदने देऊनही ठोस उपाययोजना झालेल्या नाहीत. त्यामुळे आम्ही उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून या समस्येचे निराकरण आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी करणार आहोत. याचिकेत रस्त्याच्या दुरुस्ती, वाहतूक नियोजन, आणि अपघातांना आळा घालण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांच्या निर्मिती करण्याची मागणी करणार आहोत, असे ॲड. कर्वे यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड. शंकर कोबल, सचिव ॲड. नवनाथ कड, माजी अध्यक्ष ॲड. अनिल राक्षे, ॲड. सी. एस. सांडभोर, ॲड. दीपक थिगळे, ॲड. मनिषा पवळे, ॲड. विक्रम कड, ॲड. सुभाष करंडे, ॲड. मनोहर जंबूकर, ॲड. अरुण मुळूक, ॲड. आरती सैद, ॲड. रुकसाना पठाण, ॲड. प्रवीण बोंबले आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com