खेडमध्ये जिवंत सातबारा मोहिमेचे आयोजन

खेडमध्ये जिवंत सातबारा मोहिमेचे आयोजन

Published on

राजगुरुनगर, ता. ३ : खेड तालुक्यात १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या पंधरवड्यात महसूल विभागाच्या वतीने महसूल सप्ताह साजरा करण्यात आला असून, यामध्ये प्रामुख्याने जिवंत सातबारा ही मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी दिली. तसेच, शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्यात येतील अथवा निष्कासित करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
शासनस्तरावर ऑगस्टचा पहिला आठवडा महसूल सप्ताह म्हणून साजरा केला जाणार आहे. मात्र, खेड तालुक्यात हा सप्ताह १५ ऑगस्टपर्यंत चालू ठेवण्यात येणार आहे. त्यामध्ये महसूल खात्याच्या अखत्यारितील प्रलंबित कामे, समस्या व तक्रारींचा निपटारा करण्यात येणार आहे. प्रामुख्याने मयत खातेदारांच्या वारस नोंदी लावून सातबारा उतारा अद्ययावत करण्यात येणार आहे. संबंधित खातेदारांनी महसूल विभागाकडे संपर्क साधून यासंदर्भातील कागदपत्रांची पूर्तता करावी, असे आवाहन बेडसे यांनी केले.
जी कुटुंबे सन २०११ पूर्वी शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून राहत आहेत, अशा पात्र कुटुंबांना पट्टे वाटप केले जाणार आहेत. पाणंद व शिवरस्त्यांची मोजणी करून रविवारी (ता. ३) झाडे लावण्यात येतील. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान सोमवारी (ता. ४) राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, अधिवास प्रमाणपत्र आदी इच्छुकांना वाटण्यात येणार आहेत. विशेष साहाय्य योजनेतील थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) न झालेल्या लाभार्थ्यांना घरभेटी करून अनुदान मंगळवारी (ता. ५) दिले जाईल. शासकीय जमिनीवरील अतिक्रमण निष्कासित करून त्या नियमानुसार नियमित वा सरकारजमा करण्याचे काम ६ ऑगस्टला करण्यात येणार आहे. एम-सँड धोरणाची अंमलबजावणी व एसओपीनुसार कार्यवाही गुरुवारी (ता. ७) करण्यात येणार आहे.
या महसूल सप्ताहात अज्ञान पालक शेरा, एकत्र कुटुंबातील नाव बदल, तगाई कर्ज नोंदी, सावकारी व पोकळीस्त नोंदी याबाबत निर्णय घेतले जाणार आहेत. वारसहक्क नोंदीही करण्यात येणार आहेत. संबंधित वारसांनी १ ते ७ ऑगस्टदरम्यान ई- हक्क प्रणाली वापरून वारस नोंदीसाठी अर्ज दाखल करावेत, असे आवाहन बेडसे यांनी केले.
सातबारा उताऱ्यावर असलेल्या सावकारी कर्जाचे बोजे आणि इतर जुने बोजे, जे प्रत्यक्षात अस्तित्वात नाहीत, १५ ऑगस्टपर्यंत अधिकार अभिलेखांमधून वजा करण्याचे काम हाती घेतले आहे. यामुळे शेतकऱ्यांना नवीन कर्ज घेताना किंवा इतर व्यवहार करताना होणारा त्रास टळणार आहे, असे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com