एकाच वेळी भडकल्या १० चिता

एकाच वेळी भडकल्या १० चिता

Published on

राजगुरुनगर, ता. १२ : खेड तालुक्यातील पाईटजवळील कुंडेश्वराच्या दर्शनाला जात असताना झालेल्या अपघातातील १० मृतांवर पापळवाडी या त्यांच्या गावी सोमवारी मध्यरात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. या अपघातातील जखमींची संख्या ३० असल्याचे खेड तहसीलदार कार्यालयातर्फे अधिकृतपणे जाहीर करण्यात आले. तसेच, जखमींवर मोफत उपचार करण्याच्या सूचना जखमी दाखल असलेल्या खासगी रुग्णालयांना दिल्या आहेत.
पापळवाडीतील स्मशानभूमीत एकाच वेळी १० चिता भडकल्यानंतर नातेवाइकांचा आक्रोश हृदय हेलावून टाकणारा होता. मध्यरात्र असूनही पाईट पंचक्रोशीतील गावांतील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विशेष कार्य अधिकारी दिगंबर रौंधळ, वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मधुसूदन मगर, पोलिस उपायुक्त बापू बांगर यांच्यासह प्रशासकीय अधिकारी, पोलिस अधिकारी, तालुक्यातील विविध पक्ष, संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अपघातामध्ये जखमी व्यक्तींचा वैद्यकीय व औषधोपचाराचा सर्व खर्च शासनामार्फत केला जाणार आहे. त्यामुळे रुग्णालयात दाखल असणाऱ्या अपघातग्रस्त व्यक्तींवर आवश्यक ते सर्व वैद्यकीय वैद्यकीय उपचार व औषधोपचार करण्यात यावे. वैद्यकीय देयक किंवा मेडीकल स्टोअरमधील औषधांच्या देयकांकरिता आग्रह न धरता सर्व रुग्णांवर विनाविलंब उपचार सुरु ठेवावेत, अशी सूचना खेड उपविभागीय कार्यालयामार्फत खासगी रुग्णालयांना दिली आहे. जखमींवर मोशी येथील साईनाथ हॉस्पिटल, चाकण येथील युनिकेअर हॉस्पिटल, राजगुरुनगर येथील शिवतीर्थ हॉस्पिटल, पोखरकर हॉस्पिटल, सुश्रुत हॉस्पिटल, गावडे हॉस्पिटल, साळुंके हॉस्पिटल आणि पाईट येथील पवार हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. दरम्यान, सुलाबाई बाळू चोरघे यांना अधिक उपचारांसाठी चिंचवड येथील आदित्य बिर्ला रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
या अपघातातील मृतांना आणि जखमींना सरकारी मदत मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पापळवाडीत भरून घेण्यात आली. यासाठी पोलिस उपनिरीक्षक दत्ता जाधव, मंडल अधिकारी मनीषा सुतार, ग्राम महसूल अधिकारी प्रतिभा कसबे, पोलिस हवालदार बन्सी रौंधळ, राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष जयसिंग दरेकर, पोलिस पाटील मच्छिंद्र चोरघे, पाईट ग्रामपंचायतचे हरिभाऊ रौंधळ यांनी सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com