‘लुटेरी दुल्हन’ची टोळी जाळ्यात

‘लुटेरी दुल्हन’ची टोळी जाळ्यात

Published on

राजगुरुनगर, ता. १७ : बनावट नवरी उभी करून तिच्याशी लग्न लावून देऊन आणि नंतर तिच्यासह पोबारा करत फसविणारी महिलांची टोळी खेड पोलिसांनी पकडली आणि तीन संशयित महिला आरोपींना अटक केली. एक महिला मात्र अजूनही फरारी आहे. खेड तालुक्यातील जैदवाडी येथील शेतकरी कुटुंबातील तरुणाशी १ लाख ६० हजार रुपये घेऊन लग्न करून दुसऱ्याच दिवशी नवरीसह पळून गेल्याप्रकरणी खेड पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यात पोलिसांनी ही कारवाई केली.
जैदवाडी येथील शेती करणाऱ्या मुलाचे लग्न मराठवाड्यातील मुलीशी ज्योती संतोष तांबोळी (वय ४०, रा. वडगाव सहाणी, ता. जुन्नर) या महिलेच्या मध्यस्थीने ठरले. सुवर्णा उत्तम गव्हाणे (वय २८, रा. उमरगा, जि. उस्मानाबाद), असे नाव सांगण्यात आलेल्या मुलीबरोबर हे लग्न ठरले. त्या मोबदल्यात मध्यस्थी ज्योती तांबोळी, मुलगी सुवर्णा गव्हाणे, तसेच सुवर्णाची मामी अनुसया राजेंद्र मोरे (वय ५०, रा. उमरगा) आणि मावशी मनीषा बाळू कदम (वय ४५, रा. यशवंत कॉलनी, निलंगा, जि. लातूर) यांनी संगनमत करून फिर्यादीकडून १ लाख ६० हजार रुपये घेतले. इतरही खर्च मुलाकडच्यांनी केला. त्यानंतर घाईगडबडीत लग्न लावण्यात आले. लग्नानंतर नवरीची कथित मामी आणि मावशी तिच्याबरोबर जैदवाडी येथेच थांबल्या. दुसऱ्या दिवशी सर्वजण गाढ झोपले असताना रात्री दोनच्या सुमारास नवरी आणि बरोबरच्या दोन महिलांनी मागच्या दरवाजातून पोबारा केला. ही घटना २२ एप्रिल ते २५ एप्रिल २०२५ दरम्यान घडली होती.
या गुन्ह्याच्या तपासात खेड पोलिसांच्या तपास पथकाने धाराशीव व लातूर जिल्ह्यात जाऊन स्थानिक पोलिस व महसूल यंत्रणेकडून माहिती मिळवली. तपास कौशल्य वापरून संशयित आरोपींचा छडा लावला. संशयित आरोपींची खरी ओळख पटवून सुवर्णा उत्तम गव्हाणे (वय २८, रा. सारोळा, ता. औसा, जि. लातूर), अनसूया राजेंद्र मोरे ऊर्फ सारिका नंदकुमार भोईने (वय ५०, रा. खडकगाव, ता. जि. लातूर), मनीषा बाळू कदम ऊर्फ रेखा मिलिंद सूर्यवंशी (वय ४५, रा. गणेश मंदिराजवळ कोल्हेनगर, ता. जि. लातूर) यांना अटक केली. न्यायालयाने त्यांना १९ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
ही कामगिरी पोलिस निरीक्षक सुभाष चव्हाण यांच्या सूचनांनुसार खेड पोलिस ठाण्याचे हवालदार संतोष मोरे, संतोष कंटाळे, विशाल कोठावळे व महिला पोलिस अंमलदार वैशाली कांबळे यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com