चासमधील गतिमंदाला 
गुलामासारखी वागणूक

चासमधील गतिमंदाला गुलामासारखी वागणूक

Published on

राजगुरुनगर, ता. २४ : चास (ता. खेड) येथील गतिमंद प्रौढाचे अपहरण करून त्याला सातारा जिल्ह्यातील अंदोरी (ता. खंडाळा) या गावात एका माणसाकडे सोडले. त्या माणसाने मारहाण करत त्याच्याकडून गुलामासारखे काम करून घेतले. अखेर सव्वादोन वर्षांनंतर हा प्रौढ शिरवळ पोलिस ठाण्यामार्फत चास येथे परतला. त्याच्या मागोमाग त्याला पळवून घेऊन जाणारे त्याला शोधत आले आणि लोकांनी त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी अपहरण, मारहाण आणि गुलामीची वागणूक दिल्याचा चौघांवर गुन्हा दाखल करून दोघांना शनिवारी (ता. २३) अटक केली.
याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप मधुकर टोके (रा. गुंजवठा- चास) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचे थोरले भाऊ प्रवीण ऊर्फ नागेश मधुकर टोके (वय ४३, रा. गुंजवठा- चास) हे गतिमंद आहेत. ते २३ एप्रिल २०२३ रोजी टोकेवाडी- कडूस (ता. खेड) येथील फाट्यावर उभे होते. त्यावेळी बंडू सहादू साळुंके (रा. वडगाव पाटोळे, ता. खेड), सचिन रघुनाथ चव्हाण (रा. कडूस) व एक अनोळखी व्यक्ती, या तिघांनी त्यांना पळवून नेले. त्यानंतर त्यांना अंदोरी येथे एका माणसाकडे (नाव समजले नाही) सोडले. त्या माणसाने प्रवीण ऊर्फ नागेश यांना तेव्हापासून २० ऑगस्टपर्यंत डांबून ठेवले. या सव्वादोन वर्षांच्या काळात त्यांना गुलामाप्रमाणे वागवून त्यांच्याकडून वेठबिगाराप्रमाणे गाईचा गोठा साफ करणे, सरपण आणणे, गाईचा गवत व चारा आणणे, गाईला पाणी पाजणे, अशी कामे करवून घेतली. काम न केल्यास त्यांना मारहाण करून त्यांच्या पाठीवर, हातावर, कानावर सळईने चटके दिले.
दरम्यान, अपहृत प्रवीण हे शिरवळ (जि. सातारा) पोलिस ठाण्यात कसे हजर झाले, हे त्यांना सांगता येत नाही. शिरवळ पोलिसांनी चासच्या पोलिस पाटलांशी संपर्क साधून माहिती दिल्यावर फिर्यादी प्रदीप टोके त्यांना चासला घेऊन आले. दरम्यान, शनिवारी प्रवीण यांचा फोटो दाखवत जेथून ते पळवले गेले होते, तेथे दोन माणसे त्यांना शोधत आल्याचे प्रदीप यांना कळले. त्यांनी भावाला तेथे नेऊन बसवले. ती माणसे आसपास येताच त्यांना पकडून चासला नेले व पोलिसांना बोलावून त्यांच्या ताब्यात दिले. नंतर कुटुंबीय व मोठ्या संख्येने ग्रामस्थ तक्रार देण्यासाठी खेड पोलिस ठाण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com