माऊली सेवा प्रतिष्ठानकडून अतिवृष्टीग्रस्तांना आर्थिक मदत
राजगुरुनगर, ता. १९ : येथील माऊली सेवा प्रतिष्ठानच्या वतीने धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील भोत्रा आणि रुई येथील अतिवृष्टीग्रस्त कुटुंबांना आर्थिक मदत देण्यात आली.
प्रतिकुटुंब एक हजार पाचशे याप्रमाणे एकूण ३० कुटुंबांना रोख स्वरूपात ही मदत करण्यात आली. तीस कुटुंबांना एकूण ४५ हजार रुपयांचे वाटप शुक्रवारी (ता. १७) त्यांच्या गावी जाऊन करण्यात आले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष कैलास दुधाळे, सदस्य संजय घुमटकर, कैलास मुसळे, वासुदेव गोपाळे आदी यावेळी उपस्थित होते. प्रतिष्ठानकडे राजगुरुनगर शहरातील अनेक दानशूर लोकांनी ही आर्थिक मदत दिली होती. तसेच, देहू रस्ता येथील नवनाथ भजनी मंडळाने देणगी जमा करून प्रतिष्ठानकडे दिली होती.
धाराशिव जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी ज्योती नाईकडे पाटील, डोमगावचे माजी सरपंच बालाजी मिस्कीन, सतीश मिस्कीन, भोत्रा गावचे सरपंच तुषार पाटील, रोहिदास गोफणे, जयसिंग लिमकर यांच्या मार्गदर्शनाखाली या मदतीचे नियोजन केले होते. अतिवृष्टीग्रस्त गरजू कुटुंबांना मदतीचा हात देऊन माणुसकी जपण्याचे काम माऊली सेवा प्रतिष्ठानने केले असल्याची भावना यावेळी बालाजी मिस्कीन यांनी व्यक्त केली. भोत्रा आणि रुई ग्रामस्थांच्या वतीने प्रतिष्ठानचे आभार मानले.
04068