विकास आघाडी झाल्यास तिरंगी लढती

विकास आघाडी झाल्यास तिरंगी लढती

Published on

विकास आघाडी झाल्यास तिरंगी लढती

राजगुरुनगर नगरपरिषदेच्या निवडणुकीत यावेळी नगराध्यक्षपद खुल्या गटासाठी निश्चित झाल्याने राजकीय वर्तुळात उत्साह आहे. बहुतांश मावळत्या सदस्यांना पुन्हा लढण्याची संधी मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप, महाआघाडीतील घटक पक्ष आणि उर्वरित, असे तीन पॅनेल होण्याची शक्यता आहे.

- राजेंद्र सांडभोर, राजगुरुनगर

खेड तालुक्यातील राजगुरुनगर परिषदेची स्थापना सन २०१४मध्ये झाली. त्यानंतर एक वर्षांने पहिली निवडणूक झाली. त्या निवडणुकीत कुठल्याही पक्षाला बहुमत मिळाले नव्हते. एकूण १८ जागांपैकी ७ भाजपला २ शिवसेनेला आणि तब्बल ९ जागा अपक्षांना मिळाल्या होत्या. त्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाच्या चिन्हावर उमेदवार उभे केले नव्हते. मात्र, निवडून आलेले बहुसंख्य अपक्ष उमेदवार माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी पुरस्कृत केलेले होते. त्यानंतर अपक्ष व शिवसेनेने मिळून सत्ता स्थापन केली. नगराध्यक्ष अपक्ष झाले, तर उपनगराध्यक्षपद शिवसेनेकडे गेले होते. अडीच वर्षांनंतर सत्तांतर होऊन भाजपचे नगराध्यक्ष झाले होते.
राजगुरुनगर नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप, महाआघाडीतील घटक पक्ष आणि उर्वरित, असे तीन पॅनेल होण्याची शक्यता आहे. गेल्या निवडणुकीत लोकांनी नव्या दमाचे नगरसेवक निवडून दिले होते. यावेळी नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद खुल्या गटासाठी निश्चित झाल्याने राजकीय वर्तुळात उत्साह आहे. कैलास सांडभोर, शांताराम घुमटकर, किरण आहेर, मंगेश गुंडाळ, शिवाजी मांदळे, बाळासाहेब हरिभाऊ सांडभोर, प्रदीप कासवा, मनोहर सांडभोर, सागर सातकर, एकनाथ सांडभोर, दीपक थिगळे, सोपान डुंबरे आदी इच्छुकांची नावे प्रथमदर्शनी चर्चेत आली आहेत.
निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत नुकतीच पार पडली. या सोडतीने बहुतांश मावळत्या सदस्यांना पुन्हा लढण्याची संधी मिळणार असल्याचे स्पष्ट झाले. तब्बल १० वर्षाने निवडणूक होत असल्यामुळे अनेक नवीन चेहरेही मैदानात उतरण्यासाठी सरसावले आहेत. यावेळी दोन सदस्यांचा एक याप्रमाणे नऊ प्रभाग असून, तीन सदस्यांचा एक प्रभाग आहे. एकूण दहा प्रभागांतून २१ नगरसेवक निवडून द्यायचे आहेत.
राज्यस्तरावर झालेल्या पक्षफुटीमुळे पक्षपातळीवर गोंधळाचे वातावरण आहे. खेड तालुक्यात महायुतीतील पक्षांमध्ये बेबनाव आहे. त्यामुळे राजगुरुनगर नगरपरिषदेत महायुती आणि महाआघाडी, अशी थेट लढत होण्याची शक्यता कमी आहे. माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप एकत्र येऊन निवडणुकीला सामोरे जातील, अशी शक्यता आहे. आमदार बाबाजी काळे महाआघाडीतील पक्षांना व समविचारी मंडळींना बरोबर घेऊन पॅनेल करतील, असे संकेत आहेत. माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली एक पॅनेल होण्याची शक्यता आहे. शहर विकास आघाडी अशा प्रयोगाचीही चर्चा चालू आहे. आमदार बाबाजी काळे विकासाची ब्ल्यू प्रिंट घेऊन येणार असल्याच्या जाहिराती झळकल्या आहेत. तर, सत्तेत असल्याने आम्हीच विकासाची कामे करू शकतो, अशी भूमिका घेऊन माजी आमदार दिलीप मोहिते पाटील मैदानात उतरत आहेत. मोठ्या प्रमाणात नागरी समस्या असल्याने एकजिनसी सत्ता येणे आवश्यक आहे. अधांतरी कार्यकारिणी आली तर राजकीय आट्यापाट्या खेळण्यातच सगळा वेळ जातो, हे गावाने मागे पाहिलेले आहे.

मागील पक्षीय बलाबल
एकूण १८ जागा, ७ भाजप, २ शिवसेना आणि ९ अपक्ष.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com