चांदूसला पूर्ववैमनस्यातून तरुणाचा गोळ्या झाडून खून
राजगुरुनगर, ता. २७ : खेड तालुक्यातील चांदूसच्या तरुणाचा पूर्ववैमनस्यातून गुरुवारी (ता. २७) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास गोळ्या झाडून खून केला. केतन श्यामराव कारले (वय २३, रा. चांदूस), असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी शुभम संतोष तांबे (वय २१, रा. आसखेड, ता. खेड) व त्याच्या दोन अज्ञात साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी केतन याच्या पत्नीने फिर्याद दिली आहे. शुभम हा लग्नापूर्वी तिचा मित्र होता. तसाच तो केतन याचाही मित्र होता. तसेच, अंकुर रमेश कारले (वय २३, रा. चांदूस) हा तिचा लग्नापूर्वीचा प्रियकर होता, पण नंतर त्यांचे संबंध तुटले. पुढे सन २०२२मध्ये तिचा केतन याच्याबरोबर प्रेमविवाह झाला. ते मुंबईला राहायला गेले. पण लग्नानंतरही अंकुर तिला फोन करत होता. त्यामुळे केतन त्याला अनेकदा समज द्यायचा, तेव्हा तो केतनलाच धमकी द्यायचा.
दरम्यान, केतन आणि त्याची पत्नी सन २०२३मध्ये दिवाळीला चांदूसला आले होते, तेव्हा अंकुर त्यांच्या घरात आला व केतनशी भांडू लागला. त्यामुळे केतनने मित्र शुभम यास घरी बोलावून घेतले. शुभम त्यांच्या मध्ये आला. त्याचा अंकुरला राग आला व त्याने शुभमवर गोळीबार केला. त्यात शुभम जखमी झाला. याप्रकरणी शुभमने अंकुर व केतन या दोघांविरोधात फिर्याद दिली. खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर केतन यालाही अटक झाली होती. नंतर दोन महिन्यांनी त्याची जामिनावर सुटका झाली. पुढे खटल्याच्या तारखांना येताना केतन याला शुभमकडून मारण्याच्या धमक्या मिळत होत्या. दरम्यान, गुरुवारी सकाळी खेड न्यायालयात खटल्याच्या तारखेसाठी केतन पत्नीसह चांदूस येथील घरून मोटारसायकलवरून (क्र. एम.एच. १४ के.वाय. ३७७०) निघाला होता. चांदूसजवळील लादवडच्या कोळेकर वस्तीजवळ पोहोचल्यावर पत्नीने नैसर्गिक विधीसाठी गाडी थांबवण्यास सांगितले. त्यामुळे केतन याने गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली आणि पत्नी बंद दुकानाच्या मागे गेली. तेव्हा तिला दोन- तीन गोळ्यांचा आवाज आला. तिने घाबरून बाहेर येऊन पाहिले असता शुभम तांबे हा त्याच्या मोटारसायकलवर बसलेला होता आणि त्याच्या हातात पिस्तूल होते. त्याच्याबरोबर दोन अज्ञात व्यक्ती होते व ते केतन याच्या गाडीवर बसले होते. ती धावत पतीकडे गेली, तेव्हा तो जखमी अवस्थेत पडला होता. तिने आरडाओरडा केला, तेव्हा शुभम आणि त्याचे साथीदार पतीची मोटारसायकल घेऊन पळून गेले. तिने तातडीने सासूला बोलावून घेतले. दोघींनी एका छोट्या टेम्पोमध्ये केतनला चांडोली ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
याबाबत खेड पोलिस ठाण्यात संशयित शुभम तांबे आणि त्याच्या दोन साथीदारांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. ते तिघेही फरार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

