राजगुरुनगरमध्ये विशेष सभेत वादाची ठिणगी

राजगुरुनगरमध्ये विशेष सभेत वादाची ठिणगी

Published on

राजगुरुनगर ता. २४ : राजगुरुनगर (ता. खेड) नगरपरिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सभापतींच्या शुक्रवारी (ता. २३) झालेल्या निवडीच्या विशेष सभेमध्ये शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी सभात्याग केला. त्यानंतर त्यांच्या अनुपस्थितीमध्ये पार पडलेल्या या विशेष सभेमध्ये विषय समित्यांच्या सभापतींच्या निवडी बिनविरोध झाल्याची माहिती मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांनी दिली.
विषय समित्यांच्या सभापतींच्या निवडींसाठी शुक्रवारी नगरपरिषदेच्या सभागृहात मुख्याधिकारी तथा पीठासन अधिकारी अंबादास गर्कळ यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा बोलावण्यात आली होती. सभा सुरू होण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने दोन समित्यांच्या सभापतिपदांची मागणी केली. मात्र, त्यांच्या मागणीस सत्ताधारी शिवसेनेने नकार दिला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सभात्याग करून निघून गेले. त्यानंतर १८ नगरसेवकांच्या उपस्थितीत झालेल्या विशेष सभेत समित्यांच्या सभापतींच्या निवडी करण्यात आल्या. स्थायी समितीचे सभापती नगराध्यक्ष पदसिद्ध असतात, त्यानुसार नगराध्यक्ष मंगेश गुंडाळ यांची स्थायी समिती सभापती पदासाठी निवड झाली.‌ पाणीपुरवठा आणि जलनिस्सारण सभापती उपनगराध्यक्ष असतील, असे सभेने ठरवले. त्यानुसार मनोहर सांडभोर यांची पाणीपुरवठा आणि जलनिस्सारण सभापतीपदी निवड झाली. उर्वरित चार समित्यांसाठी प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे या चारही समित्यांच्या सभापतींच्या निवडी बिनविरोध झाल्याचे पीठासीन अधिकारी गर्कळ यांनी घोषित केले. नियोजन व विकास समितीच्या सभापतीपदी श्वेता ढोले, अर्थ व सार्वजनिक बांधकाम सभापतीपदी किशोर थिगळे, महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी सुनंदा थिगळे आणि स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य व शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती सभापतीपदी सुप्रिया पिंगळे यांची निवड झाली.

समितीत सभापतींसह चारच सदस्य
नगरपरिषदेत शिवसेनेने त्यांचे निवडून आलेले नगराध्यक्ष मंगेश गुंडाळ, १० नगरसेवक आणि दोन अपक्ष नगरसेवक मिळून १३ जणांचा भोपाळबुवा महाराज विकास समिती हा गट स्थापन केला आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या ५ नगरसेवकांचा हुतात्मा शिवराम हरी राजगुरू विकास समिती, असा गट स्थापन केला आहे. तर, भारतीय जनता पक्षाचे ४ नगरसेवक आहेत. प्रत्येक समितीत सभापतींसह ५ सदस्य आहेत. तौलनिक संख्याबळानुसार प्रत्येक समितीत भोपाळबुवा महाराज विकास समिती गटाचे ३, हुतात्मा शिवराम हरी राजगुरू विकास समिती गटाचा १ आणि भाजपचा १ सदस्य असणार आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवक सभात्याग करून गेल्याने आता प्रत्येक समितीत सभापतींसह चारच सदस्य निवडण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com