शिष्यवृत्तीच्या लाभासाठी शासकीय प्रवेश गरजेचा

शिष्यवृत्तीच्या लाभासाठी शासकीय प्रवेश गरजेचा

राजेगाव, ता. ८ : ‘‘शासनाच्या विविध शिष्यवृत्यांचा लाभ घेऊन ८० टक्के विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतात. पण त्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया ही शासकीय प्रवेश प्रक्रियेतूनच झाली पाहिजे.’’ असे मत दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांनी व्यक्त केले.
बारामतीतील मुक्ताई लॉन्स येथे ७ ते ९ जून कालावधीत आयोजित केलेल्या ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो’मध्ये आज (ता. ८) झालेल्या सेमिनारमध्ये झोळ बोलत होते. याप्रसंगी झोळ म्हणाले, ‘‘ज्यांना इंजिनिअरिंगमध्येच करिअर करायचे आहे त्यांनी दहावीनंतरच डिप्लोमा इंजिनिअर हा पर्याय निवडून पुढे इंजिनिअरिंग करावे. पालकांनी जागरूकता ठेऊन व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे तयार ठेवावीत. आवश्यक सर्व कागदपत्रे असतील तरच प्रवेश मिळतो हे लक्षात ठेवा. जेवढ्या जास्त प्रवेश फेरीत अडकाल तेवढे जास्त विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकते. तेव्हा पालकांनी प्रवेश प्रकियेवेळी स्वत: मुलांबरोबर उपस्थित राहणे गरजेचे आहे.’’
यावेळी इंजिनिअरला प्रवेश घेताना काय काळजी घ्यावी या विषयावर बोलताना प्रा. आर. जी. बिरादार म्हणाले, ‘‘प्रवेश फॉर्म व्यवस्थित भरावा. कॉलेजची निवड करताना पालकांची कुवत आणि गुणवंत विद्यार्थ्यांसाठी इंजिनिअरिंग करिअरमध्ये प्रचंड संधी आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी पुणे मुंबईत शिक्षणासाठी आल्यानंतर स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून अभ्यास केला तर प्रचंड यश मिळते. विद्यार्थी हुशार असेल तर तो कोणत्याही बॅचमधून इंजिनिअर झाला तरी यशस्वी होतो.’’
‘व्यक्तिमत्त्व विकास’ या विषयावर बोलताना विशाल घिगे म्हणाले, ‘‘व्यक्तिमत्त्व म्हणजे व्यक्त होणे. व्यक्तिचे व्यक्तिमत्त्व त्याच्या दिसण्यावर नसून त्याच्या असण्यावर असते. स्वत:चा स्वीकार करणे, शरीर आणि मनाचा व्यायाम करणे, स्वतःवर प्रचंड विश्वास ठेवणे आणि स्वतः प्रेम करणे हे व्यक्तिमत्त्वाचे पैलू आहेत. शिक्षित होणे, सुशिक्षित होणे, सुसंस्कारित होणे आणि सृजनशील व्यक्तिमत्त्व घडविणे यासाठी शिक्षण महत्त्वाचे आहे. पालक विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध करून देतात, परंतु त्याच्या डोक्यावर कायम अपेक्षांचे ओझे ठेवतात. मुलांना त्यांच्या आवडीनुसार क्षेत्र निवडायची संधी द्यायला हवी.’’ सूत्रसंचालन प्रा. मनोज वाबळे यांनी केले.

बारामती येथील एज्युकेशन एक्सपोमध्ये आल्यानंतर परिसरातील विविध शिक्षण संस्था आणि ॲकॅडमीकडून माझ्या पाल्यांसाठी योग्य मार्गदर्शन मिळाले. मला जे अपेक्षित होते ते मार्गदर्शन मिळाल्यामुळे मी खूप समाधानी आहे.
हनुमंत तरडे, पालक, शारदानगर

सकाळ विद्या एज्युकेशन एक्सपोमध्ये विविध महाविद्यालय आणि विविध ॲकॅडमीचे स्टॉल आहेत. विद्यार्थ्यांना भविष्यातील संधी, स्पर्धात्मक परीक्षा यांचा अभ्यास कसा करावा याबद्दल खूप चांगले मार्गदर्शन मिळत आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून आर्थिक सहाय्य होत असल्याने विद्यार्थी आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत.
अंकुश पवार, पालक, वालचंदनगर

या उपक्रमांमध्ये अनेक शैक्षणिक संस्था, नामांकित ॲकॅडमी यांनी विद्यार्थी आणि पालकांना भविष्यातील शैक्षणिक गरजा आणि त्यावरील उपायाबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना बारावीनंतर आपल्यापुढे करिअर निवडण्यासाठी या एक्सपो मधून खूप छान मदत झाली.
सचिन भुसे, शिक्षक, डॉ. शंकरराव कोलते विद्यालय ज्युनिअर कॉलेज पिसर्वे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com