सहकारी संस्था, पतसंस्थांच्या कर्जवसुलीला ‘ब्रेक’

सहकारी संस्था, पतसंस्थांच्या कर्जवसुलीला ‘ब्रेक’
Published on

राजेगाव, ता. २७ : लोकसभेला नाही निदान विधानसभेला तरी कर्जमाफी होणारच हा ठाम विश्वास दौंड तालुक्यासह जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या मनात असल्याने बॅंका, सहकारी संस्था यांच्या कर्जवसुलीला ब्रेक लागला आहे. सर्वसाधारणपणे ७० टक्के खातेदारांनी कर्ज भरण्याकडे पाठ फिरविल्याने शेती सहकारी संस्था, विकास सोसायट्या अडचणीत आल्या आहेत.

पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या राजेगाव शाखेत असणाऱ्या राजेगाव, वाटलूज, खानवटे, श्रीराम खानवटे, जय भवानी राजेगाव या सर्व संस्थाच्या कर्जदार सभासदांनी ३० जूनला कर्ज भरण्याकडे पाठ फिरवल्यामुळे सर्वच संस्था अडचणीत आल्या आहेत. सध्या राज्य सरकार मुख्यमंत्री लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका शेतकरी अशा विविध योजना राबवत असल्याने विकास सोसायटीकडून कर्ज घेतलेले कर्जदार शेतकरीसुद्धा आपली कर्जमाफी होईल, या आशेने कर्ज भरण्यास टाळाटाळ करीत असल्याचे चित्र ग्रामीण भागात सर्वत्र दिसून येत आहे. यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या विकासाचा कणा असलेल्या विकास सोसायट्यांना मात्र घरघर लागली असून, संस्था अडचणीत येऊ लागल्या आहेत. अक्षरश: कर्मचाऱ्यांना पगार द्यायला देखील पैसे नाहीत, अशी काही ठिकाणी संस्थांची परिस्थिती निर्माण झाली आहे.


सभासदांना लाभांश देणे बनले अवघड
मागील वर्षी पाऊस कमी झाल्याने शासनाने कर्जवसुलीबाबतचे धोरण शिथिल केले होते. कोणत्याही कर्जदाराकडे सक्तीची कर्जवसुली करू नका, अशा प्रकारचे निर्देश सहकार विभागाचे होते. त्याचाही परिणाम कर्जवसुलीवर झाला असल्याचे मत संस्थेच्या पदाधिकारी व्यक्त करीत आहेत. एखाद्या कर्जदाराचे कर्ज थकले, तर जिल्हा बँकेचा वसुली अधिकारी व संबंधित विकास सोसायटीचे संचालक मंडळ थकबाकीदाराच्या वसुलीसाठी जातात. घरी एखाद्या थकीत कर्जदारावर जप्तीची कारवाई होते. परंतु, कर्जवसुली होत नाही, कर्ज वेळेवर वसूल होत नसल्यामुळे सभासदांना लाभांश देणे देखील काही विकास सोसायट्यांना अवघड बनले आहे.

लहान सोसायट्या बंद पडण्याची शक्यता
वसुलीअभावी विकास सोसायट्या आर्थिक अडचणीमध्ये आल्या आहेत. सचिव व संचालक मंडळ यांच्यामध्ये समन्वय लागतो. बँकेच्या वसुली अधिकाऱ्याने वेळोवेळी थकीत कर्जदारांकडे जाऊन कर्जवसुलीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसे झाले तर या सोसायट्या ऊर्जितावस्थेमध्ये येतील; अन्यथा तालुक्यातील बऱ्याच लहान सोसायट्या आर्थिक अडचणीमध्ये येऊन बंद पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दौंड तालुक्यातील एक अग्रगण्य संस्था म्हणून आमच्या संस्थेकडे पाहिले जाते. दरवर्षी संस्था सभासदांना १० टक्केच्या आसपास लाभांश वाटप करत असते. परंतु या वर्षी कर्जमाफीच्या आशेने ७० टक्क्यांपेक्षा जास्त सभासदांनी कर्जवसुलीकडे पाठ फिरवली असल्याने यंदा लाभांश वाटप करण्यात अडचण येऊ शकते.
- मधुकर जामले, अध्यक्ष, राजेश्वर सोसायटी राजेगाव, ता. दौंड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com