दिवाळी पर्यटनावर विधानसभा निवडणुकीची ‘आचारसंहिता’

दिवाळी पर्यटनावर विधानसभा निवडणुकीची ‘आचारसंहिता’
Published on

राजेगाव, ता. २२ : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम नुकताच जाहीर झाला असून, निवडणूक दिवाळीनंतर २० नोव्हेंबर रोजी आहे. परंतु या निवडणुकीसाठीचे कर्तव्य आदेश, प्रशिक्षण हे दिवाळीच्या सुट्टीतच येत असल्याने लाखो रुपये भरून कुटुंबासहीत फिरायला जाण्याचे घेतलेले पॅकेज रद्द करण्याची वेळ पालक, शिक्षक व सरकारी कर्मचाऱ्यांवर आलेली आहे.
पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांना २७ आॕक्टोबर ते १२ नोव्हेंबरदरम्यान दिवाळीची सुट्टी आहे. परंतु विधानसभा निवडणुकीच्या कर्तव्याचा आदेश शिक्षक आणि सरकारी कर्मचाऱ्यांना प्राप्त झाला आहे. निवडणुकीसाठीचे पहिले दोन्ही प्रशिक्षण दिवाळीच्या सुट्टीतच आहेत. पहिले प्रशिक्षण २७ आॕक्टोबर, तर दुसरे प्रशिक्षण १० नोव्हेंबरला आहे.
दरम्यान, या वर्षी महाराष्ट्रात १९ एप्रिल ते २० मे यादरम्यान पाच टप्प्यांत लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होऊन ४ जून रोजी मतमोजणी झाली होती. त्यामुळे अनेक सरकारी कर्मचारी, शिक्षक, पालकांना उन्हाळी सुट्टीतील सहलीचे पॅकेज रद्द करण्याची वेळ आली होती. उन्हाळी सुट्टीत रद्द झालेले पर्यटन दिवाळी सुट्टीत करण्याचा बेत अनेकांनी आखला होता. महाराष्ट्रातील बहुतांश पर्यटकांनी देशात, तसेच परदेशातही सहलींचे नियोजन केले होते. विशेषतः मुलांच्या शाळांना दिवाळीत सुट्टी असल्याने सर्व पालक, शिक्षक इत्यादी पर्यटक फिरायला जाण्याचे नियोजन करत असतात. परंतु या वर्षी जाहीर झालेल्या निवडणूक तारखांमुळे पर्यटकांच्या फिरायला जाण्याच्या आनंदावर पाणी पडले आहे.
महाराष्ट्रात मूळ गावी जाणारे हजारो शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आहेत. तसेच दीर्घ सुट्टी असल्यामुळे महाराष्ट्रातील अनेक मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परदेशी अथवा देशांतर्गत प्रवासाचे नियोजन यापूर्वीच केले आहे. अचानक निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यामुळे सहलीचे हे संपूर्ण नियोजनच कोलमडले आहे. लाखो रुपये भरून कुटुंबासहीत बाहेर फिरायला जाण्याचे घेतलेले पॅकेज रद्द करण्याची वेळ शिक्षकांवर आलेली आहे.
निवडणुकांमुळे शिक्षकांचे सुट्टीचे नियोजनही कोलमडणार आहे. बरेच शिक्षक दिवाळीची सुट्टी असल्यामुळे गावी जाणे, शेतातील कामे करणे, लग्न समारंभ, शुभकार्य यामध्ये सहभागी होणे, मित्र-परिवार, नातेवाइकांच्या गाठीभेटी घेणे, असे नियोजन करत असतात; परंतु निवडणुकांमुळे एकंदरीत शिक्षकांच्या सुट्टीचे सर्वच नियोजन कोलमडून जाणार आहे.

आम्ही मित्रांनी सहकुटुंब दिवाळीच्या सुट्टीत पर्यटनाचे नियोजन केले होते. भारतातील सर्वांत सुंदर पर्यटनस्थळे असणाऱ्या राजस्थान या ठिकाणी पहिल्यांदाच चाललो होतो. सर्व बुकिंगही झाले होते; परंतु विधानसभा निवडणुकीचा कर्तव्य आदेश आल्याने नाइलाजास्तव सहलीचे नियोजन रद्द केले. त्यामुळे सगळे नाराज झाले आहेत.
-राजेंद्र धवडे, शिक्षक, भिलारवाडी, ता. करमाळा

दिवाळीची सुट्टी मजेत घालवावी, असे सगळ्यांनाच वाटत असते. या सुट्ट्यांमध्ये कुटुंबीय आणि मित्रमंडळींसोबत सहलीला जाणे अत्यंत आनंददायी असते. या मोठ्या सहलीचे छान प्लॅनिंग करून आपल्या भारतातील अनेक सुंदर ठिकाणांना भेट देऊन आम्ही सहलीचा आणि मिळालेल्या मोठ्या सुट्टीचा आनंद द्विगुणित करत असतो.
-दादासाहेब शेलार, शिक्षक, राजेगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com