कोंबडखतामधून मिळवला यशाचा सुगंध
राजेगाव, ता. १४ ः राजेगाव (ता. दौंड) परिसरातील शिंग्रोबामाळ येथील युवक संतोष जगताप यांनी सुरुवातीला हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम केले. नंतर मार्केटयार्डात हमालीही केली. नंतर स्वतःच्या शेतीत टाकण्यासाठी हैदराबाद येथून १५० गोणी कोंबड खत आणले होते. येथून व्यवसायाचा गमभन होऊन आज कोंबड खत विक्रीतील मोठे व्यापारी हा जगताप यांचा प्रवास थक्क करणारा आहे.
ग्रामीण भागातील अनेक तरुण नोकरीसाठी आटापिटा करत असतात. शहरात जाऊन एखादी खासगी नोकरी मिळवतात. पण, तुटपुंज्या पगारावर कुटुंबाचा खर्चही भागत नसल्याने निराश होऊन परतात. परंतु, मनामध्ये जिद्द चिकाटी आणि प्रामाणिकपणे मेहनत करण्याची तयारी असेल उंच भरारी घेऊ शकतो, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे संतोष जगताप.
जगताप यांचे शिक्षण परिस्थितीमुळे आठवीतूनच बंद झाले. शाळा सोडल्यानंतर त्यांनी भिगवण रेल्वे स्टेशन येथील कँटीनमध्ये दुधाचा रतीब सुरू केला. तरीही पैशाची टंचाई होत असल्याने कष्टाची कोणतीही लाज मनात न बाळगता जगताप यांनी भिगवणमध्ये एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून वर्षभर काम केले. तरीही कुटुंबाचे आर्थिक गणित काही केल्या जुळत नव्हते. शेवटी घर, गाव सोडण्याचा निर्णय करून त्यांनी थेट पुणे गाठले. पुण्यातील मार्केटयार्डमध्ये तीन वर्षे हमालीचे काम केले. या कष्टाच्या कमाईवर पुण्यात असतानाच त्यांनी कुटुंबाला पैसे पुरवले आणि शिंग्रोबामाळ येथे छोटेसे किराणा दुकान टाकले. दरम्यान, पुण्यात रात्रंदिवस मेहनत करूनही अपेक्षित आर्थिक परिस्थितीत फारसा फरक पडत नसल्याने पुण्याहून थेट गावचा रस्ता धरला. गावाकडे कुटुंबासमवेत शेती आणि दुकानात लक्ष द्यायला सुरुवात केली. स्वतःच्या आठ एकर शेतीबरोबरच आणखी सात एकर शेती खंडाने करायला सुरुवात केली.
अठरा विश्व दारिद्र्य जणूकाही पाचवीलाच पुजले होते, की काय? अधिकाधिक उत्पन्न मिळविण्यासाठी कुटुंबांतील सर्व सदस्य रात्रंदिवस शेतीमध्ये काबाडकष्ट करून नवनवीन प्रयोग करत होते. त्याचाच भाग म्हणून उत्पन्न वाढीसाठी स्वत:च्या शेतीत टाकण्यासाठी १५० गोणी कोंबड खत घेऊन घराजवळच उतरून घेतले. शेजारी-पाजारी असलेल्या इतर शेतकऱ्यांनी या कोंबड खताविषयी चौकशी करून त्यांच्या शेतीसाठी मागणी केली. अक्षरशः लोकांची मागणी एवढी वाढली की, सर्व गोण्यांची विक्री झाली. त्यामधून थोडे पैसे नफा मिळाला. अशा तऱ्हेने मागणी वाढतच गेल्याने परत ४-५ गाड्या कोंबडखत मागवल्या. त्याही लगेचच संपल्यावर मग मात्र हाच धंदा करण्याचा विचार मनात घोळू लागला. आणि ठरवले धंदा जरी घाणीचा असला तरी दोन पैसे मिळत असतील तर तो आपण करायचाच. मग धंदा समजून घेण्यासाठी ज्या ठिकाणाहून कोंबड खत येते तेथे म्हणजे थेट बेंगलोर आणि हैदराबाद गाठले. सहा महिने तेथील सर्व अनुभव घेतला. तेथील व्यापाऱ्याबरोबर संपर्क वाढवला, चांगली ओळख झा., खात्री पटली आणि २०१४ साली स्वतःचा मोठ्या प्रमाणात व्यवसाय सुरू केला. काही दिवसांतच व्यवसायाने भरभराट घेतली. महिन्याला चांगली रक्कम मिळू लागली. व्यवसायात दोन बंधू अमोल आणि सागर यांना मदतीला घेतले.
कोंबडी खत हे एक मौल्यवान सेंद्रिय खत आहे, ज्याचा विविध पिकांना फायदा होऊ शकतो. त्याची पौष्टिक-समृद्ध रचना जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी आणि वनस्पतींच्या वाढीस चालना देण्यासाठी योग्य बनवते. कोंबडी खताच्या वापरामुळे अनेक पिकांना फायदा होऊ शकतो. कोंबडखत हे पिकांच्या वाढीसाठी खूप परिणामकारक ठरते. परंतु बरेच शेतकऱ्यांना त्याच्या दुर्गंधीमुळे शेतात कोंबडखत कसे टाकायचे हा प्रश्न पडायचा. त्यासाठी जगताप यांनी स्वतःचीच ५० मजुरांची टोळी तयार केली. व्यवसायातून मिळालेल्या पैशातूनच या व्यवसाय वृद्धीसाठी आवश्यक म्हणून स्वतः घ्या मालकीच्या दोन ट्रक, एक हायवा, एक पिक अप आणि दोन ट्रॅक्टर खरेदी केले आहेत.
या भागातून मागणी
दौंड, इंदापूर, बारामती, फलटण, भोर, सोलापूर, नातेपुते, काष्टी, अहमदनगर या परिसरातून दररोज मागणी झाल्याचे थेट शेतात खत पोहच केले जाते. सध्या एका गोणीची किंमत १६० रुपये, हमाली ५ रुपये आणि थेट शेतात टाकायला २० रुपये मिळतात. खूप पाऊस झालाच तर वर्षभरात २-३ महिने व्यवसाय बंद राहतो. अन्यथा ८-९ महिने हा व्यवसाय वेगाने चालू राहतो.
मेहनत केल्याशिवाय कोणत्याही क्षेत्रात यश मिळत नाही, हे त्रिवार सत्य आहे. वेटर, हमाली यांसारखी कामे करताना लाज न बाळगता काम करत राहिलो. रासायनिक खतांच्या वाढलेल्या किमती व पुरेशा शेणखताची अनुपलब्धतेमुळे पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कोंबड खताच्या वापराकडे कल वाढत आहे. नगदी पिकांना कोंबड खत अधिक फायदेशीर ठरत असल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. कोंबडी खत हे एक मौल्यवान सेंद्रिय खत आहे, ज्याचा विविध पिकांना फायदा होऊ शकतो. त्यामुळे आज व्यवसायात यश मिळत गेले.
- संतोष जगताप, शिंग्रोबामाळ राजेगाव (ता. दौंड)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

