जनावरांचे बाजार ७० टक्क्यांनी पडले
राजेगाव, ता. १३ : सतत कमी होत असलेले दुधाचे दर, महागलेले पशुखाद्य, दूध धंद्याचे कोलमडले अर्थकारण यामुळे जनावरांच्या बाजारात गायींचे दर कमालीचे ढासळले आहेत. चार महिन्यांपासून बाजारांमध्ये उठाव दिसून येत नसल्याने १ लाख रुपये किमतीची गाय केवळ २५ ते ३० हजार रुपयांना मिळत आहेत. त्यालाही अपेक्षित ग्राहक मिळत नसल्याचे चित्र आहे. यामुळे लाखो रुपयांचे कर्ज काढून या धंद्याकडे वळलेल्या दौंड तालुक्यातील तरुण दूग्ध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील राजेगाव परिसरातील शेतकरी शेतीबरोबरच जोडधंदा म्हणून प्रामुख्याने दुग्धव्यवसाय करत आलेला आहे. सध्या दुग्धव्यवसाय हाच त्यांच्या कुटुंबाचा प्रमुख आधार बनला आहे. मात्र, वर्षभरापासून दूधदरात कपातच होत असल्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. त्यातच पशुखाद्याचे दरही मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. सद्य:स्थितीत ३.५ फॅट ८.५ एसनएफ असणाऱ्या दुधाला २८ रुपये दर मिळत आहे. सरकारने ही तूट भरून काढण्यासाठी दुधाला आधी पाच व नंतर वाढवून सात रुपये अनुदान दिले. तरी विकतचा चारा, कामगार, पशुखाद्य याचा ताळमेळ बसत नसल्याने अनेक मोठे गाईंचे गोठे ओस पडल्याचे दिसत आहेत.
दुभत्या जनावरांचे दर ४० ते ६० टक्क्यांनी खाली आले आहेत. बाजारातील आवक कमी झाली आहे. दुधाला दर नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. यामुळे दुभत्या जनावरांच्या खरेदी-विक्रीवरही गंभीर परिणाम झाला आहे. या परिसरात बारामती, राशीन (ता. कर्जत), काष्टी (ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) येथे जनावरांचे बाजार भरतात. या बाजारांत दुभत्या गाई, म्हशींची मोठ्या प्रमाणात विक्री होते. या बाजारामध्ये दुभत्या गाईंनाच दर नसल्याने भाकड गाई विकायच्या कशा हा प्रश्न निर्माण होत आहे.
पशुखाद्य : पूर्वीचे दर : सध्याचे दर
गोळीपेंडीची बॅग : १२०० : १७५०
भुसा : १००० : १६००
शेंगदाणा पेंड : १६०० : २४००
आधुनिक तंत्रज्ञान वापरून, मुक्त संचार गोठा पद्धत, चारा व्यवस्थापनामध्ये मुरघासाचा वापर, स्वच्छ दूध निर्मिती करून जास्त दर मिळविण्यासाठी, तसेच दुग्धजन्य पदार्थ निर्मिती करण्यावर भर दिला पाहिजे. जनावरांचे आजार, लसीकरण, गुणवत्तापूर्ण रेतन इत्यादी बाबींचे दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्राथमिक ज्ञान असले पाहिजे. उत्पादन खर्च कमी करून जास्तीत जास्त नफा मिळविण्यासाठी प्रयत्न केला तरच दूध धंदे टिकतील.
-डॉ. गौरव कदम, पशुधन पर्यवेक्षक, राजेगाव, ता. दौंड
सध्या चाऱ्याची टंचाई असल्याने उसाचे वाढे हाच चारा म्हणून वापरला जात आहे. त्यामुळे दुधाची गुणवत्ता कमी होत आहे. थंडीमुळे दुधाचे प्रमाण कमी झाले आहे. व्यवसाय टिकवण्यासाठी दूग्ध उत्पादक शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. शासनाने दुधाचे दर कमीत कमी ४० रुपये करावेत. दुधाला बाजारपेठेत मागणी नसेल, तर शासनाने बाराही महिने अनुदान देऊन दिलासा द्यावा.
- भारत खराडे, अध्यक्ष, श्री. राजनाथ दूध शीतकरण केंद्र, राजेगाव, ता.दौंड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

