पाणकणीस वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर
राजेगाव, ता. १५ : एकेकाळी ग्रामीण भागात अत्यावश्यक असणारी पाणकणीस ही पाणवनस्पती सद्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. तीस- चाळीस वर्षांपूर्वी ग्रामीण भागामध्ये पाणकणीसांच्या पेंढ्या व गव्हाच्या पिकाच्या काडाने शेकारलेली अनेक घरे दिसून येत होती. त्यासाठी त्याचा उपयोग होत आहे.
तळ्याच्या काठावर, ओढे-नाले, पाणथळ दलदलीच्या ठिकाणी हमखास आढळणारी पाणकणीस वनस्पती हद्दपार होऊ लागली आहे. पाणकणसांच्या पानांचा उपयोग जुन्या काळापासून आजपर्यंत कच्च्या घरांच्या छप्पराला शेकारण्यासाठी केला जात होता. मात्र, आता सिमेंट, पत्र्याच्या जमान्यात पाला- पाचोळा वापरून केलेली छप्पराची घरेही कमी झाली आहेत. आता झपाट्याने नागरिकरण होत असल्याने अशी घरे बांधणारा वर्ग ही कमी झाला आहे.
उन्हाळ्यामध्ये अत्यंत थंड वातावरण करणाऱ्या छप्परामध्ये शेतकऱ्यांनी, कष्टकऱ्यांनी, शेतमजुरांनी वर्षांनुवर्ष श्रमपरिहार केला. नागवेलीच्या मळ्यामध्ये नागवेलीचे झाड पांगरा अथवा शेवरीच्या झाडाच्या आधाराने उंच नेण्याकरता शेतकरी पानमाळ्यामध्ये पानकणसांच्या पाल्याचाच वापर करून वेलाची झाडाला बांधणी करीत असत. दौंडमध्ये काही ठिकाणी कांदा चाळ उभारण्यासाठी पाणकणीस वनस्पतीचा उपयोग केला जात आहे.
लोकोपयोगीच्या दृष्टीने संवर्धन होणे गरजेचे
शेतकरी आणि स्थानिक लोकांकडून पाणकणसाच्या खोडाचा व पानांचा वापर चटया, दोर, टोपल्या, चाळणी आणि छप्पर तयार करण्यासाठी पूर्वी मोठ्याप्रमाणात केला जात असे. पिकलेल्या कणसातील मऊ भाग जखमेवर लावल्यास जखम भरून निघण्यास मदत होते. झाडांची मुळे नदी व तळ्याकाठची जमीन एकत्र धरून ठेवतात आणि जमिनीची धूप थांबवितात. पाणथळ पक्षी, उभयचर प्राणी आणि इतर जलचरांचा निवारा आणि लपनक्षेत्र म्हणून ही वनस्पती अत्यंत महत्त्वाची आहे. वनस्पतीचे लोकोपयोगी व पर्यावरणीय मूल्य लक्षात घेता तिचे जतन आणि संवर्धित करणे ही समाज आणि शासन या दोघांची नैतिक जबाबदारी आहे.
01076
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

