दौंडच्या सहा गावातील वीजपुरवठा अखेर सुरळीत
राजेगाव, ता. ७ ः दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली, खडकी, रावणगाव, नंदादेवी, मळद आणि लोणारवाडी या गावांना भिगवण येथील विद्युत उपकेंद्रातून होणारा वीज पुरवठा २४ तासांच्या अथक प्रयत्नानंतर सुरळीत झाला.
भूमिगत असलेल्या वाहिनीच्या दोषामुळे या गावांमधील वीजपुरवठा खंडित झाला होता. वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने या त्रासाला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. ऐन गौरी गणपती उत्सवाच्या काळात या गावांचा विद्युत पुरवठा शुक्रवारी (ता. ५) रात्रीपासून खंडित झाला होता. चिंचोलीजवळील ३३ केव्ही भूमिगत केबल लाइनच्या दोन्ही केबल पुन्हा एकदा नादुरुस्त झाल्या होत्या. हे गेल्या सात आठ महिन्यांत दोन- तीनवेळा झाले आहे. त्यामुळे या गावांचा वीज पुरवठा खंडित राहणे नित्यनेमाचे झाले आहे.
दरम्यान, रावणगाव येथे नवीन वीज उपकेंद्र (सबस्टेशन) होत असताना भिगवण येथून येणारी मुख्य वीज वाहिनी भूमिगत असून, संबंधित शेतकऱ्याच्या शेताच्या हद्दीतून भूमिगत केबल अंथरण्यात आली आहे. पुढे पुणे- सोलापूर महामार्गाच्या रुंदीकरणात ही केबल सेवा रस्त्यात गेली. वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याने येथील ग्रामस्थ- शेतकऱ्यांचे वीज पुरवठ्याअभावी दैनंदिन व्यवहार ठप्प झाले होते. याची तत्काळ दखल खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली.
कुरकुंभचे सहाय्यक अभियंता मुंघसे व त्यांचे सर्व सहकारी यांनी २४ तासांच्या प्रयत्नानंतर विद्युत पुरवठा सुरळीत केला. संबंधित भूमिगत केबल ही काढून टाकण्यात यावी आणि पोल उभा करून नवीन लाइन उभा करण्यात यावी, अशी मागणी उपस्थित ग्रामस्थांनी केली आहे. या मागणीला प्रशासनाने होकार दिल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. लाइन उभारण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर केल्यास आठ दिवसांमध्ये नवीन लाइन उभारून देऊ आणि कायमस्वरूपी तोडगा निघेल, असे आश्वासन कुरकुंभ उपविभागाचे सहाय्यक अभियंता मुंघसे यांनी दिले.
यावेळी मच्छिंद्र मदने, युवा अभियंता नीलेश शिंदे, ज्ञानेश शिंदे, लाइनमन ढवळे, ठेकेदार प्रशांत राणवरे आदी उपस्थित होते.
यासाठी कायमस्वरूपी पर्याय शिर्सुफळवरून मुख्य लाइनचा सर्वे करून या फिडरला बारामतीची लाइन जोडणे महत्त्वाचे आहे. तशा स्वरूपाची मागणी आम्ही आमदार राहुल कुल यांच्याकडे केली आहे.
-पद्माकर कांबळे, युवा शेतकरी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.