जमिनीच्या मोजणीवरून कोयत्याने वार
राजेगाव, ता. ११ : स्वामी चिंचोली (ता. दौंड) येथे जमीन मोजणीचा अर्ज दिल्याच्या कारणातून भावकीतील लोकांना कोयत्याने वार केले. यामध्ये सुभाष शिंदे हे गंभीर जखमी झाले असून, वाद सोडवण्यासाठी गेलेले सुभाष शिंदे यांची दोन्ही मुले प्रशांत आणि राहुल यांनादेखील मारहाण झाले असून, ते देखील जखमी झालेत. ही घटना मंगळवार (ता. ९) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास झाली.
सुभाष शिंदे यांचा मुलगा राहुल शिंदे यांनी घटना झाल्यानंतर रात्री ११ वाजता दौंड पोलिसात फिर्याद नोंदविली होती. परंतु, पोलिसांनी गुन्हा नोंद करण्यात टाळाटाळ करून गुरुवारी (ता. ११) मध्यरात्री १ वाजता गुन्हा दाखल केल्याचे नातेवाइकांनी सांगितले. दौंड पोलिसात संजय पोपट शिंदे, विजय पोपट शिंदे, स्वप्नाली संजय शिंदे, कविता पोपट शिंदे आणि पोपट किसन शिंदे (सर्व रा. स्वामी चिंचोली) या पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
जखमी सुभाष शिंदे यांनी भूमी अभिलेख विभागाकडे जमीन मोजणीसाठी अर्ज केला होता. यासंदर्भात हल्ला करणारे संजय शिंदे यांना १२ सप्टेंबर रोजी मोजणीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस आली होती. याचाच राग मनात धरून संजय शिंदे यांनी सुभाष शिंदे यांच्या घरी जाऊन, ‘मोजणीचा अर्ज का देतो? तुझा अर्ज माघारी घे नाही तर तुझं कुटुंब संपवून टाकील,’ असे म्हणत शिवीगाळ केली. यातूनच पुढे संजय शिंदे यांनी काही वेळातच कोयता घेऊन येत सुभाष शिंदे यांच्यावरती हल्ला चढवला. त्यात ते गंभीर जखमी झाले.
दरम्यान, सुभाष शिंदे यांची दोन्ही मुले प्रशांत शिंदे आणि राहुल शिंदे हे वाद सोडविण्यासाठी आले असता त्यांच्यावरही संजय शिंदे यांनी हल्ला चढवला. यामध्ये तेही जखमी झाले आहेत. या वादावेळी संजय शिंदे आणि त्यांच्या कुटुंबातील अन्य व्यक्तींनीही कोयता आणि लोखंडी रॉडने मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. जखमींना भिगवण येथील खासगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल केले आहे.